Sanju Samson : संजू सॅमसनचा कहर! पाच दिवसात साकारली तिसरी वादळी खेळी, सूर्या-गंभीरची वाढली डोकेदुखी

कोची ब्लू टायगर्ससाठी संजूची वादळी सलामी –
केरळ क्रिकेट लीगमध्ये संजू सॅमसन कोची ब्लू टायगर्सकडून खेळत आहे, ज्याचे नेतृत्व त्याचा भाऊ सॅली सॅमसन करत आहे. संजूने या सामन्यातही सलामीवीराची भूमिका स्वीकारली. सुरुवातीला त्याने संयमाने खेळ करत परिस्थितीचा अंदाज घेतला, पण नंतर त्याने आपला खास आक्रमक अंदाज दाखवला, ज्यासाठी तो क्रिकेटविश्वात ओळखला जातो.
३० चेंडूत अर्धशतक, ३७ चेंडूत ६२ धावा –
संजूने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. मात्र, ३७ चेंडूत ६२ धावा करुन तो बाद झाला. यावेळी त्याने ४ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्याच्या या खेळीच्या जोरावर कोची ब्लू टायगर्सला मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले.
केसीएलमध्ये सॅमसनचा धमाका कायम –
विशेष म्हणजे या लीगमध्ये संजूने आतापर्यंत सलामीवीर म्हणून खेळताना एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. जर त्याला आशिया चषकात सलामीला संधी मिळाली नाही आणि खालच्या फळीत खेळण्यास सांगितले, तर त्याच्या फॉर्मवर परिणाम होऊ शकतो. उपकर्णधार शुबमन गिलचा प्लेइंग इलेव्हनमधील समावेश जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भारतीय संघ कोणते संयोजन निवडेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सूर्यकुमार यादवपुढे संघ निवडीची कसोटी –
पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया चषकासाठी संजू सॅमसनची भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. सध्याच्या फॉर्मनुसार, कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी संजूला बाहेर ठेवणे कठीण असेल. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनची निवड करणे सूर्यकुमार यादवसाठी सोपे नसेल. सॅमसनच्या या सातत्यपूर्ण कामगिरीने भारतीय संघ व्यवस्थापनापुढे सुखद डोकेदुखी निर्माण झाली आहे. आता सर्वांचे लक्ष आशिया चषकातील त्याच्या खेळीवर असेल.





