Mohammad Haris : ‘त्याला काठीनं हाणलं पाहिजे…’, बाबरबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हारिसबाबत बासित अलीची संतप्त प्रतिक्रिया

मोहम्मद हारिसचे बाबरबद्दल वादग्रस्त वक्तव्य –
पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम आणि यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यांना त्यांच्या धीम्या खेळामुळे टी-20 आंतरराष्ट्रीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यासंदर्भात स्थानिक यूट्यूब चॅनेलवर बोलताना मोहम्मद हारिस म्हणाला, “बाबर आणि रिझवान यांनी पाकिस्तानसाठी अनेक चांगले प्रदर्शन केले यात शंका नाही. पण जेव्हा तुम्ही एक नवीन मानक स्थापित करू इच्छिता, तेव्हा कनिष्ठ खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे. बाबर आझमने टी-20 क्रिकेटमध्ये अधिक वेगाने खेळण्याची गरज आहे.” हारिसच्या या वक्तवाने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
बासित अलीने हारिसच्या वक्तव्याचा घेतला समाचार –
Basit Ali slams Mohammad Haris for his remarks on Babar Azam.
“If Mohammad Haris says Babar Azam needs improvement, I think Haris should be beaten with a stick. Haris, who are you to speak about Babar Azam?” Basit said on a YouTube channel. pic.twitter.com/aOd02jjIhJ
— SportsManch (@thesportsmanch) August 27, 2025
मोहम्मद हारिसच्या या वक्तव्याने माजी पाकिस्तानी खेळाडू बासित अली यांना तीव्र संताप आला. एका यूट्यूब चॅनेलवर कामरान अकमल यांच्याशी बोलताना बासित अली म्हणाले, “मोहम्मद हारिस जर बाबर आझमच्या खेळात सुधारणेची गरज असल्याचे म्हणत असेल, तर मला वाटते त्याला काठीने मारले पाहिजे. हारिस, तू बाबर आझमबद्दल बोलणारा कोण आहेस? आता कर्णधार बदलला आहे. जर बाबर आझम अजूनही कर्णधार असता, तर हारिसने असे वक्तव्य केले असते का?” बासित यांनी हारिसच्या वक्तव्याला बाबरच्या कर्णधारपदाशी जोडताना म्हटले की, बाबरच्या नेतृत्वाखाली हारिसला फार कमी संधी मिळाल्या होत्या, ज्यामुळे हा वाद अधिकच तीव्र झाला आहे.
आशिया कप 2025 च्या पार्श्वभूमीवर वाद –
आशिया कप 2025 च्या तयारीदरम्यान हा वाद पाकिस्तान क्रिकेटसाठी अडचणीचा ठरू शकतो. मोहम्मद हारिसला संघात स्थान मिळाले असले तरी त्याच्या या वक्तवाने संघातील एकता आणि खेळाडूंमधील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी खेळाडू आणि समीक्षक यांनी हारिसच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याचा संघाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.या प्रकरणावर पीसीबी आणि संघ व्यवस्थापन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





