Duleep Trophy 2025 : शुबमन, ध्रुव आणि अभिमन्यू तिन्ही कर्णधार क्वार्टरफायनलमधून बाहेर! नेमकं कारण काय? जाणून घ्या

ईस्ट झोनला धक्का, रियान परागकडे कर्णधारपद
ईस्ट झोनचा नियमित कर्णधार अभिमन्यू ईश्वरन ताप आणि मांडीच्या दुखापतीमुळे क्वार्टरफायनलमधून बाहेर पडला आहे. यापूर्वीच ईस्ट झोनचे प्रमुख खेळाडू आकाश दीप आणि यष्टीरक्षक इशान किशन यांनीही माघार घेतल्याने संघ कमकुवत झाला आहे. ईश्वरनच्या अनुपस्थितीत आसामचा स्टार खेळाडू रियान पराग याच्याकडे ईस्ट झोनच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यासारख्या खेळाडूंच्या समावेशामुळे संघाला काहीशी बळकटी मिळाली असली, तरी नॉर्थ झोनविरुद्धचा सामना ईस्ट झोनसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
नॉर्थ झोनमध्ये गिलची अनुपस्थिती, अंकित कुमार कर्णधार
नॉर्थ झोनचा कर्णधार शुबमन गिल तापामुळे दुलीप ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी हरियाणाचा खेळाडू अंकित कुमार याला कर्णधार करण्यात आले आहे. गिलच्या अनुपस्थितीमुळे नॉर्थ झोनला धक्का बसला असला, तरी संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली क्वार्टरफायनलमध्ये उतरला आहे. विशेष म्हणजे, गिल आगामी आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. आशिया कप 9 सप्टेंबरपासून सुरू होत असून, भारत आपल्या मोहिमेला 10 सप्टेंबरपासून सुरुवात करेल. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.
सेंट्रल झोनमध्ये ध्रुव जुरेल बाहेर, रजत पाटीदार कर्णधार –
सेंट्रल झोनचा कर्णधार ध्रुव जुरेल मांडीच्या दुखापतीमुळे क्वार्टरफायनलमधून बाहेर पडला आहे. आशिया कपसाठी भारतीय संघाच्या स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असलेल्या जुरेलला नुकतीच ही दुखापत झाली, त्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. जुरेलच्या जागी आयपीएल विजेता कर्णधार रजत पाटीदार याच्याकडे सेंट्रल झोनचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. नॉर्थ-ईस्ट झोनविरुद्ध सेंट्रल झोनचा सामना रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळवला जात आहे.





