Sangvi News: “कारवाई केली ठीक, पण रस्ता का अडवला?” रस्त्यावरील डीजेच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे वाहतूक कोंडी
Sangvi News: नवी सांगवी ते पाण्याच्या टाकी मार्गावर दुचाकीस्वारांसाठी धोका; रिफ्लेक्टर किंवा बॅरिकेड्स नसल्याने रात्रीच्या वेळी दुर्घटनेची भीती.

Sangvi News – गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजे साऊंड सिस्टीमवर कारवाई करून पोलिसांनी जप्त केलेली ट्रॅक्टर-ट्रॉली सांगवी पोलीस ठाण्याच्या समोरच मुख्य रस्त्यावर उभी करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून, दुचाकीस्वारांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे सांगवी पोलिसांचा निष्काळजीपणाच नागरिकांच्या जीवावर भेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पोलिसांनी कारवाई केलेल्या या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर मोठी डीजे सिस्टीम असून, ती निळ्या ताडपत्रीने झाकून रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ट्रॉलीच्या आजूबाजूला कोणतेही बॅरिकेड, रिफ्लेक्टर किंवा सूचना फलक लावण्यात आलेला नाही. दिवसासुद्धा दुचाकीस्वारांना याचा अंदाज येत नसताना रात्रीच्या वेळी तर हा धोका अधिकच आहे.
नवी सांगवीतून पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावर अचानक उभ्या असलेल्या या अवजड ट्रॉलीला एखादे वाहन धडकल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे योग्यच आहे. मात्र, पोलिसांनी जप्त केलेले वाहन अशा पद्धतीने मुख्य रस्त्यावर उभे करून दुसरा अपघात घडवून आणणे कितपत योग्य आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ ही ट्रॅक्टर-ट्रॉली सुरक्षित ठिकाणी हलवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांनाही त्रास
पीएमपीएमएल बस थांब्यासमोरच ट्रॅक्टर ट्रॉली उभी केल्याने प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. बसची वाट पाहत रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे. तसेच बस आल्यानंतर रस्ता अधिकच अरुंद होत असल्याने कोंडी अधिक वाढते.





