Pimpri Encroachment: ‘दिसली जागा, टाकली टपरी’! पालिकेच्या डोळ्यांसमोर शहराचा पदपथच गिळंकृत…कुणाचा वरदहस्त?
Pimpri Encroachment: पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत टपऱ्यांचा विळखा वाढला; मुख्य रस्ते, चौक आणि बसस्थानक परिसरातील पदपथ अतिक्रमणांमुळे झाले गायब.

Pimpri Encroachment- मोकळी जागा दिसली की टपरी उभारायची. काही दिवसांत व्यवसाय सुरू करायचा. पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत टपऱ्यांचा हा प्रकार वाढला आहे. मुख्य रस्ते, चौक आणि बसस्थानक परिसरही त्यातून सुटलेला नाही. अनेक ठिकाणी पदपथावरच पत्र्यांच्या टपऱ्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी जागा कमी झाली आहे. वाहतुकीची कोंडीही वाढत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला सध्या अनेक अनधिकृत टपऱ्या दिसतात. काही ठिकाणी रातोरात टपऱ्या उभारल्या जातात. सुरुवातीला हातगाडी किंवा छोटा बाकडा ठेवला जातो. त्यानंतर त्याच जागेवर पत्र्याचे शेड उभे केले जाते. पुढे ते कायमस्वरूपी दुकानाचे स्वरूप घेते. वाढत्या टपऱ्यांबाबत अतिक्रमणाबाबत तक्रारी केल्या जातात. महापालिकेकडून काही ठिकाणी नोटिसाही दिल्या जातात.
मात्र, पुढील कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे अनधिकृत व्यावसायिकांचे धाडस वाढत आहे. पदपथावर टपऱ्या उभारल्याने चालण्यासाठी जागा उरत नाही. नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागते. शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांचीही कोंडी होते. वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरून चालताना अपघाताचा धोका वाढतो.
काही ठिकाणी टपऱ्या रस्त्याच्या अगदी कडेला उभारल्या आहेत. त्यामुळे रस्त्याची रुंदीही कमी झाली आहे. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शहराच्या सौंदर्यावरही त्याचा परिणाम होत आहे. पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत आहेत. लोकप्रतिनिधींकडूनही प्रशासनाकडे पाठपुरावा केला जातो. तरीही ठोस मोहीम दिसत नसल्याचा आरोप आहे.
त्यामुळे काही ठिकाणी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कारभार हाती घेतल्यावर अतिक्रमण मुक्त पदपथ आणि रस्ते, अशी घोषणा करून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. मात्र प्रत्यक्षात शहरातील किती पदपथ आणि रस्ते अतिक्रमण मुक्त झाले हा संशोधनाचा विषय आहे.
सर्वेक्षण करून टपऱ्या हटवा
शहरातील प्रमुख रस्ते आणि पदपथांचे सर्वेक्षण करावे. अनधिकृत टपऱ्यांची यादी तयार करावी. विनापरवाना उभारलेली बांधकामे तातडीने हटवावीत. पदपथ नागरिकांसाठी मोकळे करावेत. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तक्रारी वाढल्या, कारवाई कधी?
पदपथावरील अतिक्रमणाबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत आहेत. मात्र, कारवाई सातत्याने होत नसल्याने समस्या कायम आहे. त्यामुळे महापालिकेने विशेष मोहीम राबवून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
“पिंपरी चिंचवड महापालिकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर जय गणेश वरदहस्त सोसायटी आहे. या सोसायटीच्या सीमा भिंतीलगत पदपथ आणि रस्त्यावर दिवसेंदिवस टपऱ्या वाढत चाललेल्या आहेत. याबाबत आम्ही २०२४ पासून महापालिकेकडे पत्रव्यवहार करीत आहोत. कारवाई तर सोडा मात्र पत्राला उत्तर देखील महापालिकेने दिले नाही. आमच्या सोसयटीसमोर निर्माण झालेल्या टपऱ्यांमध्ये पान, सिगारेट पासून अगदी रिक्षाही दुरूस्त केल्या जातात. आम्हाला सिगारेटचा धूर, गॅरेजमधील आवाज आणि उसाच्या गुऱ्हाळातील घुंगुरूचा आवाज सहन करावा लागत आहे. मात्र अंधळे आणि बहिऱ्या महापालिकेपर्यंत ही परिस्थिती जातच नाही. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.”
– ॲड. ऋषिकेश कामटे, जय गणेश वरदहस्त सोसायटी, पिंपरी






