Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवातील ‘डीजे’वर पुणे पोलिसांची ‘साऊंड टेस्ट’; ‘प्रेशर मिड’वर विशेष लक्ष
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी डीजे साऊंड सिस्टिमची प्रत्यक्ष चाचणी घेतली. डेसिबल पातळी आणि ‘प्रेशर मिड’ उपकरणावर विशेष लक्ष देण्यात आले.

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे साऊंड सिस्टिममुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी गुरुवारी पोलीस आयुक्तालयात विविध प्रकारच्या साऊंड सिस्टिमची प्रत्यक्ष चाचणी घेतली. या वेळी आवाजाची डेसिबल पातळी, स्पीकरची क्षमता आणि ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उपकरणांची माहिती घेण्यात आली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत अमृतकर, सहायक आयुक्त विवेक पवार यांच्यासह पुणे साऊंड असोसिएशनचे पदाधिकारी आणि साऊंड व्यावसायिक उपस्थित होते. चाचणीदरम्यान विविध प्रकारचे स्पीकर, ‘बेस’ आणि ‘टॉप’ यांचे संयोजन तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीची तीव्रता डेसिबल मॉनिटरद्वारे मोजण्यात आली.
विशेषतः ‘प्रेशर मिड’ या उपकरणावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. स्पीकरमध्ये बसविल्या जाणाऱ्या या उपकरणामुळे आवाजाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढून कर्णकर्कश ध्वनी निर्माण होतो, अशी माहिती साऊंड व्यावसायिकांनी दिली. पुणे साऊंड असोसिएशननेही अशा अनधिकृत उपकरणांच्या वापराला विरोध दर्शविला.
ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियम आणि पर्यावरणविषयक कायद्यांनुसार निश्चित करण्यात आलेल्या डेसिबल मर्यादांचे पालन व्हावे, यासाठी ही चाचणी घेण्यात आली. विविध साऊंड सिस्टिमची रचना आणि त्यामधील बदलांची माहिती घेऊन पुढील धोरण निश्चित केले जाईल.





