Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी मोठी खूशखबर! मेट्रो धावणार सलग ४१ तास; पीएमपीएमएलच्या ६२६ जादा गाड्या
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीएमएल सज्ज; प्रमुख बसस्थानके आणि मेट्रो स्टेशन जोडणाऱ्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या.
Ganeshotsav 2026 – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात तसेच गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी वाढत असताना प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पीएमपीएमएलकडून तब्बल ६२६ जादा बसगाड्या रस्त्यावर उतरविण्यात आल्या असून, प्रमुख बसस्थानके, मेट्रो स्थानके आणि महत्त्वाच्या गणेश मंडळांना जोडणाऱ्या मार्गांवर गर्दीनुसार अतिरिक्त बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत.
त्यामुळे गणेशभक्तांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. वल्लभनगर बसस्थानकासह शहरातील प्रमुख ठिकाणी गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन पीएमपीएमएलने अतिरिक्त बससेवेचे नियोजन केले आहे. काही मार्गांवर बसफेऱ्या रात्री उशिरापर्यंत, तर काही मार्गांवर पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
मेट्रोचा ‘वेगवान’ दिलासा
बसस्थानकांवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मेट्रो सेवाही महत्त्वाची ठरत आहे. गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात मेट्रो सुमारे पाच मिनिटांच्या अंतराने धावत असल्याने पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरातील विविध भागांत जाणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होत आहे. वल्लभनगर बसस्थानक परिसरातील प्रवाशांनाही पिंपरी मेट्रो स्थानकाचा पर्याय उपलब्ध असल्याने बसची गर्दी टाळून जलद प्रवास करता येत आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी, २५ सप्टेंबर रोजी, गणेश विसर्जनासाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन मेट्रो सेवा सलग ४१ तास सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विसर्जनानंतर रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांनाही सार्वजनिक वाहतुकीचा आधार मिळणार आहे.
खासगी वाहनांनाही टोलमाफी
गावाकडे, विशेषतः कोकणात, स्वतःच्या वाहनाने किंवा खासगी बसने जाणाऱ्या प्रवाशांसाठीही दिलासा देण्यात आला आहे. ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बेंगळुरू महामार्ग तसेच अटल सेतूवरील टोलमाफीची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ विशेष प्रवास परवाना घेणे आवश्यक आहे.






