PCMC News: महापालिकेला दररोज ४ लाखांचा फटका? मनसेचा ‘त्या’ ३० कोटींच्या नुकसानावरून सनसनाटी आरोप
PCMC News: जुनी सांगवीतील १८ मीटर डीपी रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली; दररोज ४ लाख रुपये तोटा होत असल्याचा मनसेचा दावा.

PCMC News: जुनी सांगवी येथील १८ मीटर डी.पी. रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेला आतापर्यंत सुमारे ३० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार हा दावा केला आहे.
मनसेच्या दाव्यानुसार, या रस्त्यासाठी २०२० मध्ये १४.४ कोटी रुपये, मे २०२५ मध्ये ५० कोटी रुपये आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये २२ कोटी रुपये, असे एकूण सुमारे ८६.४ कोटी रुपये भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम संबंधित बँकेत व्याज न मिळणाऱ्या स्वरूपात पडून असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जमीनमालकांना देय भरपाईवर १२ टक्के व्याज महापालिकेला द्यावे लागत असल्याचे मनसेने म्हटले आहे.
त्यामुळे महापालिकेच्या निधीचे नुकसान होत असून, दररोज सुमारे चार लाख रुपयांचा तोटा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या विलंबामुळे आतापर्यंत सुमारे ३० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही मनसेने म्हटले आहे. याशिवाय, २०११ मध्ये रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही मालमत्तांचा ताबा घेऊन त्यांच्या भागाचा वापर करण्यात आला; मात्र संबंधित मालमत्ताधारकांना अद्याप योग्य नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात महापालिका प्रशासन आणि भूसंपादन विभागाची भूमिका तपासण्याची मागणी मनसेने केली आहे. संबंधित बँक व भूसंपादन अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याची शक्यताही मनसेने व्यक्त केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.





