Sanaswadi Crime: धक्कादायक! सणसवाडीत ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; थेट भोपाळमध्ये नेऊन केला खून
Sanaswadi Crime: सणसवाडीत कामासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील महिलेच्या दुसऱ्या पतीचे भयानक कृत्य; ५ वर्षीय बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार.

Sanaswadi Crime – सणसवाडी (ता. शिरूर) येथे एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करून, मायलेकींना जीवे मारण्याची धमकी देत भोपाळ येथे नेऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोपाळ रेल्वे पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल रजनीश कुमार कोरी (रा. बडगाव गेट बाहेर, अन्नपूर्णा कॉलनी, पोदिना, झाशी, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
उत्तरप्रदेश येथील एक महिला तिच्या पाच वर्षांच्या मुलीसह 6 जून रोजी सणसवाडी (ता. शिरूर) येथे कामासाठी आली होती. येथे तिने आरोपी विशाल कोरी याच्याशी गळ्यात हार घालून विवाह केला होता. लग्न झाल्यानंतर सणसवाडीत राहताना विशाल याने त्या चिमुरडीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. बालिकेने हा प्रकार आपल्या आईला सांगताच, आईने विशालला याचा जाब विचारला. यावरून संतापलेल्या विशालने 21 जून रोजी मायलेकींना बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
भोपाळ रेल्वे स्टेशनवर गुपित उघड
या धमकीनंतर आरोपी विशाल हा महिला आणि बालिकेला घेऊन मूळ गावी जाण्यासाठी निघाला होता. प्रवासादरम्यान भोपाळ रेल्वे स्टेशनवर सकाळी ती बालिका अचानक बेशुद्ध पडल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बालिकेच्या शवविच्छेदनानंतर तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले.
पोलिसांकडून कसून चौकशी आणि अटक
चिमुरडीच्या संशयास्पद मृत्यूमुळे भोपाळ रेल्वे पोलिसांनी महिला आणि विशाल या दोघांची कसून चौकशी केली. या चौकशीत सणसवाडीतील अत्याचार आणि मारहाणीचा सर्व काळा कट्टा समोर आला. याप्रकरणी भोपाळ रेल्वे पोलीस उपनिरीक्षक श्वेता सोमकुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भोपाळ पोलिसांनी आरोपीला अटक करून शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





