Shikrapur News : दहीहंडी-गणेशोत्सवात आवाजाची स्पर्धा रंगवाल तर खैर नाही! शिक्रापूर पोलिसांचा थेट इशारा
आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचत असतानाच शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur News) उत्सवातील अतिउत्साहाला वेसण घालण्यासाठी कंबर कसली आहे.

Shikrapur News : आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचत असतानाच शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur News) उत्सवातील अतिउत्साहाला वेसण घालण्यासाठी कंबर कसली आहे. सणांच्या नावाखाली कानाचे पडदे फाडणारा डॉल्बीचा दणदणाट आणि डोळे दिपवून टाकणारा लेझरचा झगमगाट यंदा चालणार नाही, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि शांततेला बाधा पोहोचवणाऱ्या प्रतिबंधित साधनांवर पूर्णपणे लगाम घालण्याचा आक्रमक पवित्रा शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घेतला असून, नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा थेट इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात हद्दीतील (Shikrapur News) सर्व डॉल्बी, डिजिटल साऊंड सिस्टीम चालक आणि लेझर लाईट मालकांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पोलिसांनी स्पष्ट केले की, उत्सव काळात प्लाझ्मा, प्रेशर मेड अथवा प्रेशर साऊंडचा वापर पूर्णपणे निषिद्ध राहील.
उत्सवाच्या नावाखाली चौकाचौकात दोन साऊंड सिस्टीम समोरासमोर उभ्या करून सुरू होणाऱ्या जीवघेण्या आवाजाच्या स्पर्धांवर पोलिसांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारच्या अवाजवी साऊंड कॉम्पिटिशनमुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो, त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचे शासकीय नियम पाळण्याची संपूर्ण जबाबदारी मंडळे आणि साऊंड मालकांची असेल.
केवळ आवाजावरच नव्हे, तर बेफाम लेझर आणि हायबीम शार्पी लाईट्सवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या तीव्र प्रकाशझोतामुळे वाहनचालकांचे डोळे दिपून भीषण अपघातांची शक्यता बळावते, शिवाय नागरिकांच्या दृष्टीवरही कायमस्वरूपी विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा सर्व प्रकाशयंत्रांवर बंदी घालण्यात आली आहे.
प्रतिबंधित साधनांचा वापर आढळल्यास संबंधितांवर प्रचलित (Shikrapur News) कायद्यानुसार थेट गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. उत्सव हा श्रद्धा, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा असावा, नागरिकांच्या त्रासाचा नाही; त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.






