Shikrapur Accident: आजीचा अंत्यविधी नातीच्या जीवावर बेतला! शिवतक्रार म्हाळुंगीत काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
Shikrapur Accident: भरधाव गाडी अचानक समोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले; कारमधील पाच जण गंभीर जखमी, शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दाखल.

Shikrapur Accident- शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याने आजीच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला बसून कार उलटून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. यात पाचजण जखमी झाले आहेत. कोमल रोहन काळे (वय २६, सध्या रा. इंदुरी, सध्या रा. इंदुरी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मूळ रा. जि. बीड), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
रोहन काळे (वय २७), प्रयागा काळे (वय ४९), किशोर काळे (वय २९), आरोही रोहन काळे (वय दीड वर्षे, सर्व रा. इंदुरी तळेगाव दाभाडे ता. मावळ, मूळ रा. धनगर जवळका, जि. बीड) व ज्ञानेश्वर हरिभाऊ कढणे (रा. चिंबळी, ता. खेड), असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. शिवतक्रार म्हाळुंगी येथील न्हावरा रस्त्याने रोहन काळे, कोमल काळे, किशोर काळे, प्रयागा काळे, आरोही काळे हे कुटुंबीय ज्ञानेश्वर कढणे या मित्राच्या कारमधून बीड येथे आजीच्या अंत्यविधीसाठी जात होते.
किशोर काळे हे कार चालवत होते, शिवतक्रार म्हाळुंगी येथे समोरून भरधाव वेगाने कार अचानक पुढे आल्याने कारचालक किशोर काळे यांनी त्यांची कार बाजूला घेतली. मात्र, भरधाव कार ही रस्त्याच्या खाली शेतात उलटून अपघात झाला. अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, नागरिकांनी सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी कोमल रोहन काळे हिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. रोहन आत्माराम काळे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
सुदैवाने बालिका बचावली
शिवतक्रार म्हाळुंगी येथे कार उलटून झालेल्या अपघातात आरोही काळे ही दीड वर्षाची बालिका सुदैवाने बचावली आहे. ती किरकोळ जखमी झाली आहे. मात्र, तिच्या आईच्या प्रेमाला कायमचे मुकावे लागले असल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.





