सभासदांच्या हितासाठी सह्याद्री कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार : निवासराव थोरात

यशवंतनगर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून २७ फेब्रुवारी ते ५ मार्च अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ५ एप्रिलला मतदान तर ६ एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवासराव थोरात यांनी आज सह्याद्रीच्या ऊस उत्पादक सभासदांची बैठक वारुंजी येथे आयोजित केली होती. या बैठकीत सह्याद्रीची निवडणूक ताकदीनिशी सर्वांना सोबत घेऊन लढण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीची सुरुवात सह्याद्रीच्या उभारणीत सहभागी असलेले किवळ गावचे स्वातंत्र्यसैनिक कै. भिकोबा आप्पा साळुंखे उर्फ भिकू नाना किवळकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजली अर्पण करुन करण्यात आली. प्रास्ताविक युवा नेते अमित जाधव यांनी केले. अविनाश नलावडे यांनी प्रास्ताविकात सह्याद्रीच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक व्हावी असा सूर लावला.
कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई म्हणाले की, सुपने-तांबवे विभागात गेल्या १०-१५ वर्षांपासून ऊसतोडीसाठी दरवर्षी टोळ्यांची कमतरता आहे. ऊस उशिरा तुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जातेय. त्यामुळे सह्याद्रीत आता परिवर्तन अटळ आहे.
निवासराव थोरात म्हणाले, ३० वर्षे विद्यमान चेअरमन यांच्याच हातात एकहाती कारभार आहे. तरीदेखील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक राहतो. ज्या सभासदांनी एकहाती बिनविरोध सत्ता दिली. तेच चेअरमन न्यायासाठी दाद मागणाऱ्या सभासदांना विरोधक ठरवत आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेवून प्रायव्हेट लिमिटेडकडे वाटचाल सुरु असल्यानेच निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागत आहे.
स यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करायचे धोरण आणले होते. मात्र, इथे सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरु आहे. सहकार धोरणासाठी व यशवंत विचार टिकवण्यासाठी अशी एकाधिकारशाही घातक आहे. सह्याद्री कारखान्यातील राजकारणाचा अड्डा उधळून लावून सर्व सभासदांना समान व सन्मानाची वागणूक मिळावी यासाठीच आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. जे ज समविचारी सभासद शेतकरी बांधव सोबत येतील त्या सर्वांना सोबत घेवून सह्याद्रीची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे.
बाबूराव पवार म्हणाले, आम्ही २००९ पासून संघर्ष करत आहे. आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे. सभासदांनी एकजूट दाखवून सह्याद्रीत परिवर्तन करुन हा विजय कै. विठ्ठलराव तात्या आणि हिंदूराव साहेब यांना समर्पित करावा. प्रकाश पाटील कोपर्डेकर यांनी जे सोबत येतील त्या सर्वांना सोबत घेवून सह्याद्रीत परिवर्तन करून सर्व सभासदांना समान न्याय देणार असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी संग्राम पवार, शिवाजी चव्हाण, रविंद्र शिंदे, सचिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अनिकेत पवार यांनी सुत्रसंचालन केले तर दत्ता पाटील यांनी आभार मानले.





