सह्याद्री कारखान्यावर सत्तासंघर्ष; 54 वर्षांचा अहंकार मोडण्याचा सभासदांचा संकल्प

यशवंतनगर – गेली चोपन्न वर्ष एकाच घरात सत्ता आहे आणि तीस वर्ष स्वतः चेअरमन पदावर आहेत. विद्यमान चेअरमन आपल्या लाडक्या युवराजला कारखान्यावर कसे सेट करता येईल यामध्ये मग्न आहेत तर विद्यमान आमदारांना त्यांच्या भावाला सेट करायचं आहे. त्यांना सभासदांच्या हिताचे काही घेणंदेणं नाही. त्यांना घरी बसवण्याची वेळ आलेली आहे, असे आवाहन रामकृष्ण वेताळ यांनी केले.
मसूर येथे झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या सांगता सभेत बोलताना केले. रामकृष्ण वेताळ म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराच आपलं पॅनल आहे. चेअरमनांना अहंकार झाला होता आणि आत्ताच्या विद्यमान आमदारांना देखील अहंकार झाला आहे. अहंकार जास्त काळ टिकत नाही. विद्यमान चेअरमनांना घरी बसवण्याची विद्यमान आमदारांची आणि त्यांच्या बगलबच्चेंची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी सह्याद्रीची निवडणूक तिरंगी केली. सर्व स्वाभिमानी सभासदांनी मनामध्ये फक्त विमान चिन्ह लक्षात ठेवा आणि आपल्या सर्व उमेदवारांना निवडून द्या.
यावेळी निवासराव थोरात म्हणाले, ज्या सभासदांनी सोसायटीचे कर्ज काढून शेअर्स रक्कम भरुन कारखाना उभारणी केली, त्यांच्या वारसांच्या नोंदी केल्या नाहीत. त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. विद्यमान चेअरमनांनी संचालक मंडळाला हाताशी धरुन खोटेपणा करुन सभासदांची फसवणूक करुन त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम केलं. विद्यमान चेअरमनांना पराभव समोर दिसत असल्यामुळे मोफत साखर देण्याचे जाहीर केले. गेल्या दहा वर्षापूर्वी कारखान्याचे विस्तारीकरण होणे गरजेचे असताना केले नाही. शेतकऱ्यांकडून माफीनामे घेणाऱ्यांना सभासद माफ करणार नाहीत. सभासदांची दिवाळी अंधारमय करण्याचे काम चेअरमनांनी केले. सभासदांना सह्याद्री आपला वाटला पाहिजे, असा घडवण्याचे काम आपण करु.
यावेळी धैर्यशील कदम म्हणाले, येथे जमलेले भाडोत्री लोक नाहीत हे सर्व सह्याद्रीचे सभासद आहेत. गेल्या पन्नास वर्षांत कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला असता तर आज कारखाना कर्जात गेला नसता. अनेक कारखान्यांनी डिस्टीलरी वाढवली कारखान्यांची प्रगती केली मग सह्याद्री कारखान्याची प्रगती का झाली नाही? दरवर्षी साखर पावसात भिजून जाते असा कारभार केला तर कशी कारखान्याची प्रगती होईल. सह्याद्री कारखान्याच्या प्रगतीसाठी योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता जाणे गरजेचे आहे. ज्यांना आपण निवडून दिले त्यांना पण आज वाटू लागल सह्याद्री पण आपल्या हातात आला पाहिजे. नेत्यान नेत्याप्रमाणे वागावं. मात्र, तुम्ही बालिश वागताय. विद्यमान आमदारांनी सर्वांना गंडवायचं काम केलं आहे. आपल्याला कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळवून द्यायचा आहे. भीमराव पाटील, सचिन नलवडे, संपतराव माने, विश्वास काळभोर, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुदाम चव्हाण, भीमराव डांगे, शैलेश चव्हाण, अमित जाधव, दादासाहेब चव्हाण, अमित पाटील, शिवाजी चव्हाण, रवींद्र थोरात, अमोल थोरात, सागर थोरात यांची उपस्थिती होती. यावेळी पॅनेलचे सर्व उमेदवार व ऊसउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदय जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. सुदाम दीक्षित यांनी आभार मानले.
माझं नाव काढाल तर लंगोट पण ठेवणार नाही –
माझ्यावर एक रुपयाच्या सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पण माझ्याकडे तुमच्या काळ्या धंद्यांची यादीच आहे. माझं नाव काढाल तर लंगोट पण ठेवणार नाही, असा घणाघात रामकृष्ण वेताळ यांनी संतोष वेताळ यांच्यावर नाव न घेता केला.





