यशवंतनगर : यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ ऊस गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन ३,५०० रुपये एवढा ऊस दर जाहीर केला आहे. हा दर राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत सरस असल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले, “सह्याद्रि कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आला आहे. ऊस उत्पादकांना रास्त व चांगला दर देण्याची आमची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. येत्या हंगामातही शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत.” कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस सह्याद्रि कारखान्यासच द्यावा, असे आवाहनही चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. हंगामाच्या सुरुवातीला एवढा चांगला दर जाहीर झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगला दर देणाऱ्या सह्याद्रि कारखान्यावर शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे.