Niwasrao Thorat : ‘सह्याद्री’कारखान्याची दुकानदारी फत्यापूरमधून चालून देणार नाही; निवासराव थोरातांनी व्यक्त केला निर्धार

यशवंतनगर : ‘सह्याद्री’कारखान्याची दुकानदारी फत्यापूरमधून चालून देणार नाही, असा निर्धार निवासराव थोरात यांनी व्यक्त केला. सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ‘ कै. यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आमची लढाई आहे.
सहकारातील निवडणूक समविचारी लोकांना सोबत घेऊन लढण्याची आमची नेहमी भूमिका होती. मात्र, विद्यमान आमदारांनी आम्हाला अंधारात ठेवून एका बाजूला पूर्ण पॅनेल उभे केले आणि दुसऱ्या बाजूला चर्चा सुरू ठेवल्या. आमच्या पॅनेलच्या अधिकृत उमेदवाराला सोबत घेऊन जाहीर पाठिंबा घ्यावा लागतोय, यातून दिसतंय ही निवडणूक हातातून गेली आहे. कारखान्यासाठी ५४ वर्षे संघर्ष केला त्यांना बाजूला ठेवले.
विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी पंधरा वर्षांपासून कारखान्याचे विस्तारवाढीचे काम रखडवले. शेतकरी सभासदांना देशोधडीला लावण्याचे काम विद्यमान संचालक मंडळाने केले आहे. आम्ही दिलेल्या लढ्यामुळेच २१०० सभासदांना मतदानाचा अधिकार मिळाला.
यावेळी धैर्यशील कदम म्हणाले, ‘सह्याद्री कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी निवासराव थोरात यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार.कारखान्यावर साडेसातशे कोटी रुपयांचे कर्ज आहे. आम्ही ज्यांना मदत केली त्यांनीच निवास थोरात यांचा अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न केले. सह्याद्री कारखान्याची धुरा सांभाळण्यासाठी निवासराव थोरात सक्षम असल्यानेच रामकृष्ण वेताळ, भीमराव पाटील यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली.
सह्याद्री कारखान्यात परिवर्तन घडवून सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सह्याद्री शेतकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच लढा देत राहिलो. कराड तालुक्यातील नेतृत्वाला संधी देऊ अशी भूमिका विद्यमान आमदारांसमोर मांडली होती. परंतु, त्यांना आमदारकीबरोबर कारखानाही आपल्याकडेच हवा आहे. चार महिन्यांपूर्वी यांना गुलाल मिळावा म्हणून आम्ही सर्वांनी केलेले प्रयत्न ते सोयीस्करपणे विसरले. म्हणून आम्ही यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहे. यावेळी धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, भरत चव्हाण यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कारखान्याची वाटचाल डबघाईच्या दिशेने…
सह्याद्री कारखान्याची वाटचाल डबघाईच्या दिशेने होत असल्याचे दिसते. पन्नास कोटी भांडवल असताना कारखान्याची प्रगती शून्य झाली. विस्तारवाढीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा कर्ज उचललं. पस्तीस वर्षांच्या काळात किती कामगारांना पर्मनंट केले याच उत्तर विद्यमान चेअरमननी द्यावं. स्वतःच घर भरण्यासाठी कारखान्याचा वापर केला…
-रामकृष्ण वेताळ





