Satara : सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला धक्का

कराड : सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेत अर्ज छाननीत अवैध ठरलेल्या दहा जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलाचा निकाल काल मंगळवारी सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी जाहीर केला. यामध्ये विरोधी गटाच्या निवास थोरात यांच्यासह अन्य नऊ जणांचे अर्ज वैध ठरले असून सत्ताधारी गटाचे विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरल्याने सत्ताधारी गटाला धक्का बसला असून विरोधी गटाला दिलासा मिळाला आहे.
निवडणूक उमेदवारी अर्ज छाननीमध्ये निवडणूक निर्णय अधिकार्यांनी 205 उमेदवारांचे अर्ज वैध तर 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले होते. अवैध ठरवलेल्या बाबुराव जगन्नाथ पवार बेलवडे- हवेली (गट क्रमांक 2-तळबीड), दिलीप हनुमंत कुंभार तळबीड (इतर मागास वर्ग राखीव), सिंधुताई दादासो जाधव पाडळी – हेळगाव (महिला राखीव), जयश्री पृथ्वीराज पाटील सुपने (महिला राखीव), अधिकराव पांडुरंग माळी सुपने (इतर मागास वर्ग राखीव), संदीप यशवंत पाटील उत्तर तांबवे (गट क्रमांक 1-कराड), श्रीकांत माधवराव जाधव गोवारे ( गट क्रमांक 4-कोपर्डे हवेली), प्रतापराव गणपतराव यादव कडेपूर- कडेगाव (गट क्रमांक 1-कराड), निवास आत्माराम थोरात नडसी( गट क्रमांक 4-कोपर्डे हवेली), मानसिंगराव वसंतराव जगदाळे मसूर (गट क्रमांक 5-मसूर) या उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे, साखर संकुल, शिवाजीनगर यांचे समोर निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याच्या निर्णयाविरुद्ध कलम 152 (अ) अन्वये अपील दाखल केले होते.
गुरुवार दि. 13 मार्च 25 रोजी दुपारी 1 वाजता सुनावणी झाली होती. सदर दाखल अपिलावर सुनावणी होऊन प्रादेशिक सह संचालक साखर पुणे विभाग यांनी मंगळवारी निर्णय दिला. या 9 उमेदवारांचे अपील मंजूर करण्यात आले असून त्यांची नावे वैध उमेदवारांच्या यादीत समाविष्ट करणे बाबत आदेश देण्यात आले आहेत. मानसिंगराव वसंतराव जगदाळे, मसूर (गट क्रमांक 5-मसूर) यांचे अपील नामंजूर करण्यात येऊन निवडणूक निर्णय अधिकारी कराड यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता वैध उमेदवारांची संख्या 214 झाली असून त्यापैकी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याने उर्वरित 210 उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. दि. 21 मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत स्वतः उमेदवारास स्वतः किंवा लेखी प्राधिकृत केलेल्या सूचकामार्फत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीवकुमार सुद्रिक यांनी दिली.
एकूणच उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सत्ताधारी गटाचे विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे व विरोधी गटाचे निवासराव थोरात यांनी दाखल केलेल्या अपिलावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या अपीलावरील निर्णय जाहीर झाल्याने आता 21 मार्चपूर्वी किती उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतात यावर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीतून चौघांची माघार
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीत दाखल अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारच्या दिवशी 3 तर आतापर्यंत एकूण 4 अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव कुमार सुद्रिक यांनी दिली. सोमवारी दि. 17 रोजी व्यक्ती ऊस उत्पादक गट क्रमांक 1 कराड मतदार संघातून चंद्रकांत शामराव जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मंगळवार दि. 18 रोजी मोहन एकनाथ माने व आबा जयसिंग माने यांनी तळबीड गटातून माघार घेतली तर वाठार किरोली गटातून नितीन शिवाजीराव देशमुख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक कार्यालयात चिन्ह वाटप केले जाणार आहे.





