Pune News : सोशल मीडियावरील बदनामीप्रकरणी रुपाली चाकणकरांची तक्रार; १७ जणांची नावे जबाबात
Pune News : रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आपली बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

Pune News : सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आपले फोटो व व्हिडीओ वापरून खोटी, दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत रुपाली निलेश चाकणकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. (Pune News)
सोशल मीडिया पोस्टवर अश्लील, अपमानास्पद आणि लैंगिक स्वरूपाच्या कमेंट्स करून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चाकणकर यांनी २१ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या जबाबात सांगितले की, त्या गेल्या २२ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. (Pune News)
त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम केले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेश अध्यक्षा म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. पुण्यातील एका सामाजिक कार्यक्रमात सुमारे नऊ वर्षांपूर्वी नाशिक येथील अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. (Pune News)
खरात हे वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील ईशान्येश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष, ट्रस्टी व प्रमुख असल्याने महाशिवरात्री आणि गुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांसाठी त्यांच्याकडून चाकणकर यांना निमंत्रण मिळत असल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे. (Pune News)
१८ मार्च २०२६ रोजी अशोक खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे प्रसारमाध्यमांतून समजल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाकणकर आणि खरात यांचे सार्वजनिक कार्यक्रमांतील फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर विविध व्यक्तींनी फोटो व व्हिडीओ वापरून आपल्याबाबत आरोप केल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Pune News)
चाकणकर यांच्या जबाबानुसार, २० मार्च २०२६ रोजी त्यांनी सोशल मीडिया खाती पाहिली असता संगिता तिवारी, अॅड. अशोक बाबासाहेब बेदरे, अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, राजश्री सींदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, लॉजिकल सिद्धान्त, रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, योगेश सावंत, दिपाली सय्यद, डॉ. आशा मिरगे आणि मोहसीन शेख यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा यूट्यूब खात्यांवर आपल्याबाबत पोस्ट आढळून आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. (Pune News)
या पोस्टनंतर मिलिंद मारुती गोरे, सपना नंदकिशोर राऊत आणि इतर अनेक व्यक्तींनी अश्लील, अपमानास्पद व बदनामीकारक स्वरूपाच्या कमेंट्स केल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे मनास लज्जा उत्पन्न होऊन मानसिक त्रास तसेच सामाजिक मानहानी सहन करावी लागल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. (Pune News)
संबंधित पोस्ट आणि कमेंट्समुळे आपल्या विनयास व प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्यात आल्याचा आरोप करत चाकणकर यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. सोशल मीडिया पोस्ट, कमेंट्सचे स्क्रीनशॉट, पुराव्यांचे तक्ते आणि संबंधित कागदपत्रे तपासासाठी पोलिसांकडे सादर केल्याचेही त्यांनी जबाबात नमूद केले आहे. (Pune News)





