जगदीप धनखड देशाचे 14 वे उपराष्ट्रपती; धनखड यांना 528 मते

नवी दिल्ली – केंद्रातील सत्तारूढ आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड यांची शनिवारी अपेक्षेप्रमाणे देशाच्या 14 व्या उपराष्ट्रपतिपदी निवड झाली. आता 71 वर्षीय धनखड राज्यसभेच्या अध्यक्षपदाचीही सुत्रे स्वीकारतील. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला समाप्त होणार आहे.
त्यांचा उत्तराधिकारी ठरवण्यासाठी निवडणूक झाली. त्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार केवळ राज्यसभा आणि लोकसभेच्या 780 खासदारांना होता. त्या निवडणुकीसाठी 92.94 टक्के इतके मतदान झाले. एकूण 725 खासदारांनी मतदान केले. त्यातील 15 मते अवैध ठरली. धनखड यांच्या वाट्याला 528 मते आली. तर, विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मतांवर समाधान मानावे लागले.
धनखड यांना वैध मतांपैकी 74.36 टक्के मते मिळाली. देशात 1997 पासून झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या सहा निवडणुकांचा विचार करता धनखड यांचे मताधिक्य सर्वांधिक ठरले आहे. लोकसभेत एनडीएकडे स्पष्ट बहुमत आहे. राज्यसभेतील संख्याबळात त्या आघाडीचे वर्चस्व आहे. त्यामुळे धनखड यांचा विजय निश्चित मानला जात होता. विजयासाठी 356 मते आवश्यक होती. तो पल्ला धनखड यांनी सहज पार केला.
जगदीप धनखड यांच्या विजयानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच अल्वा यांनी त्यांना मतदान करणाऱ्या विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांचे आणि नेत्यांचेही आभार मानले. निवडणूक संपली आहे. मात्र लोकशाहीच्या, आपल्या घटनेच्या आणि संसदेची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठीचा आम्ही सुरू केलेला लढा यापुढे सुरूच राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, धनखड यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या समवेत धनखड यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले.
सत्ता मिळणाऱ्यांनी हुरळून जाऊ नये; अजित पवारांचा भाजपाला टोला
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जरी धनखड उमेदवार होते तरी त्यांनी या आघाडीच्या बाहेरील अनेक पक्षांच्या सदस्यांनी मतदान केले. त्यात प्रामुख्याने नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर कॉंग्रेस, मायावती यांचा बहुजन समाज पक्ष, चंद्राबाबू नायडू यांचा तेलगु देसम पक्ष, अकाली दल आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट यांनी त्यांच्या पारड्यात आपले मत टाकले.
तेलंगणा राष्ट्र समिती, आम आदमी पार्टी आणि शिवसेनेच्या 9 खासदारांनी मात्र अल्वा यांना मतदान केले. उपराष्ट्रपती पदासाठी मागच्या वेळी झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांना 32 टक्के मते मिळाली होती.
अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाची चीनला युद्धसराव ताबडतोब थांबवण्याची सूचना





