Vice Presidential election : उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या १२ खासदारांचे क्रॉस व्होटींग? बड्या नेत्याचा दावा

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्या पक्षांचे क्रॉस व्होटिंग झाले आहे, त्या पक्षांनी त्याचा शोध घेऊन कारवाई करावी असे आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे सदस्य संजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच याच पक्षाचे आणखी एक नेते अनुराग धांडा यांनी एक मोठा दावा करताना या निवडणुकीत २७ विरोधी खासदारांनी सरकारच्या उमेदवाराच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले असल्याचे म्हटले आहे.
अनुराग धांडा यांनी असाही दावा केला की, १२ भाजप खासदारांनीही विरोधी उमेदवाराच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले आहे. वास्तविक वेगवेगळ्या बातम्यांमध्ये असा दावा केला जात आहे की, उपराष्ट्रपती निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले. मात्र धांडा यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले.
आम आदमी पक्षाचे लोकसभेत तीन खासदार आहेत. होशियारपूरमधून राजकुमार छब्बेवाल, संगरूरमधून गुरमीत सिंग मीत हेयर आणि आनंदपूर साहिबमधून मालविंदर सिंग कांग हे खासदार आहेत. आपचे राज्यसभेत एकूण नऊ खासदार आहेत.
नारायण दास गुप्ता, स्वाती मालीवाल आणि संजय सिंह दिल्लीतून राज्यसभेत गेले आहेत. पंजाबमधून राघव चढ्ढा, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी, हरभजन सिंग आणि संत बलबीर सिंग हे राज्यसभेवर गेले आहेत.





