Rohit Sharma Injury : रोहित शर्मा फिट की अनफिट? पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुखापतीबाबत मोठी अपडेट आली समोर
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्सचा कणा आणि भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याच्या दुखापतीमुळे सध्या मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

Rohit Sharma Injury Update IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीत मुंबई इंडियन्सला एकामागून एक धक्के बसत आहेत. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात १९ धावांवर असताना अचानक ‘हॅमस्ट्रिंग’च्या त्रासामुळे रोहित शर्माला मैदान सोडावे लागले होते. गुरुवारी पंजाब किंग्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी रोहित सराव सत्रात अनुपस्थित राहिल्याने तो खेळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं काय झालं आहे रोहितला?
आरसीबीविरुद्ध २४१ धावांचा पाठलाग करताना रोहितने वेगवान सुरुवात केली होती, मात्र सहाव्या षटकात त्याला स्नायूंमध्ये ओढल्यासारखे जाणवू लागले. परिस्थिती गंभीर होऊ नये आणि भविष्यातील सामने लक्षात घेता रोहितने स्वतःहून ‘रिटायर हर्ट’ होण्याचा निर्णय घेतला. सामन्यानंतर करण्यात आलेल्या स्कॅन रिपोर्टमध्ये सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत (स्नायू फाटणे) आढळलेली नाही. ही मुंबईसाठी दिलासादायक बातमी असली, तरी हॅमस्ट्रिंगचा त्रास वारंवार उद्भवू शकतो, त्यामुळे संघ व्यवस्थापन सावधगिरी बाळगत आहे.
🚨 BIG BLOW FOR MUMBAI INDIANS 🚨
– Rohit Sharma likely to miss the match against Punjab Kings tomorrow. [Cricbuzz] pic.twitter.com/vsyxAzzZPt
— Johns. (@CricCrazyJohns) April 15, 2026
निर्णय आता रोहितच्या हाती –
पंजाब किंग्सविरुद्धचा सामना मुंबईसाठी प्ले-ऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, अनुभवी खेळाडू म्हणून रोहित आपल्या शरीराची स्थिती चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यामुळे तो शंभर टक्के फिट असेल तरच गुरुवारी मैदानात उतरेल, अन्यथा त्याला विश्रांती देऊन पुढील सामन्यांसाठी सज्ज ठेवले जाऊ शकते. क्रिकबझच्या माहितीनुसार रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे.
६००० धावांचा टप्पा आणि पुढील आव्हान –
दुखापतीच्या सावटातही रोहितने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मुंबई इंडियन्ससाठी खेळताना त्याने ६००० धावांचा टप्पा पार केला असून, अशी कामगिरी करणारा तो मुंबईचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. २३१ सामन्यांत ६०१३ धावा करणाऱ्या रोहितच्या नावावर ४० अर्धशतके आणि २ शतके आहेत.





