Gavaskar Slams Bowlers : खेळपट्टीला दोष देणे बंद करा; गोलंदाजांनी स्वतःच्या चुका सुधाराव्यात, हैदराबादमधील पराभवानंतर सुनील गावस्कर संतापले
Gavaskar Slams Bowlers : चौथ्या टी-२० सामन्यात भारताला वेस्ट इंडिजकडून २४ धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर सुनील गावस्करांनी भारतीय गोलंदाजांना खडेबोल सुनावले.

Sunil Gavaskar Slams Indian Bowlers After 24-Run Defeat Against West Indies in Fourth T20I : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताला २४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय गोलंदाजांच्या निष्प्रभ माऱ्यामुळे वेस्ट इंडिजने २४७ धावांचा डोंगर उभा केला, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ कमी पडला. या पराभवामुळे पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आली असून मालिकेचा निर्णया आता अंतिम सामन्यात होणार आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या या सुमार कामगिरीवर भारताचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ समालोचक सुनील गावस्कर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खेळपट्टीला दोष देण्यात अर्थ नाही; फुलटॉस चेंडूंवरून फटकारले –
पराभवानंतर खेळपट्टीवरून सुरू असलेल्या चर्चेचा समाचार घेताना गावस्कर यांनी गोलंदाजांवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, आपण नेहमी खेळपट्टीची चर्चा करतो आणि खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळत नसल्याचे कारण पुढे करतो. मात्र, गोलंदाज जर सातत्याने फलंदाजांच्या टप्प्यात किंवा थेट फुलटॉस चेंडू टाकत असतील, तर त्यासाठी खेळपट्टीला जबाबदार धरता येणार नाही. गोलंदाजांनी केलेल्या मूलभूत चुकांमुळेच भारताला हा मोठा फटका बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विंडीजकडून शिका यॉर्करचा वापर; गावस्करांचा सल्ला –
🔴 STOP BLAMING THE PITCH, FIX YOUR BOWLING – GAVASKAR 🤯
🎙️: Sunil Gavaskar pointed out that Indian bowlers can’t blame the pitch for everything. They bowled too many full tosses and poor-length deliveries, allowing batters to score freely.
When they finally bowled the right lengths & yorkers, they started getting wickets. 🤦
— Sam (@cricsam02) October 14, 2026
जिओहॉटस्टारशी बोलताना गावसकर यांनी नमूद केले की, तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यात भागीदारी सुरू असताना विंडीजच्या गोलंदाजांनीही सुरुवातीला फुलटॉस टाकले होते. मात्र त्यांनी त्वरित चूक सुधारली आणि अचूक टप्प्यावर यॉर्करचा प्रभावी वापर सुरू केला. त्यामुळे त्यांना सामन्यात यश मिळाले. खेळपट्टीकडून मदत मिळवण्यासाठी चेंडू योग्य लाईन आणि लेन्थवर ठेवणे अत्यावश्यक असते, मधोमध पडणाऱ्या चेंडूवर फलंदाज सहज धावा कुटणारच, असा रोखठोक सल्ला त्यांनी दिला.
मयंक आणि अर्शदीपने प्रत्येकी दिल्या ५२ धावा; गोलंदाजी ठरली महागडी –
हैदराबादच्या सामन्यात विंडीजने ३ बाद २४७ धावा कुटल्या. कर्णधार शाई होपने शतकी खेळी करत भारतीय माऱ्याची लक्तरे वेशीवर टांगली. प्रिन्स यादवचा अपवाद वगळता भारताचे प्रमुख वेगवान गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अनुभवी अर्शदीप सिंग या दोघांनीही प्रत्येकी ५२ धावांची लयलूट केली.
नव्या खेळपट्टीचा फायदा उठवण्यात भारतीय गोलंदाज अपयशी –
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नव्याने तयार केलेल्या खेळपट्टीवर चेंडू थांबून येत होता आणि उसळीही मिळत होती. अशा अनुकूल वातावरणातही परिस्थितीचा अचूक फायदा उठवण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. आता पाचव्या आणि निर्णायक सामन्यात मालिका जिंकायची असेल, तर गोलंदाजीतील या चुका तातडीने सुधाराव्या लागतील, असा स्पष्ट इशारा गावस्करांनी दिला आहे.





