Vaibhav Sooryavanshi Video : ‘रीलच्या नादात कुठे तरी धडकाल…!’ वैभव सूर्यवंशीने विमानतळावर कॅमेरामनला दिला सल्ला, VIDEO व्हायरल
Vaibhav Sooryavanshi Video : गुरुवारी दिल्ली विमानतळावर वैभव सूर्यवंशी पापाराझींना सांभाळून चालण्याचा इशारा देत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Vaibhav Sooryavanshi Warns Paparazzi at Airport Viral Video Asian Games Gold Medalist : जपानमध्ये पार पडलेल्या आयची-नागोया एशियन गेम्स २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावून मायदेशी परतलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सदस्य आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. गुरुवारी दिल्लीत दाखल होताच विमानतळावर छायाचित्रकारांनी वैभवला गराडा घातला. १५ वर्षीय वैभवने कोणालाही निराश न करता थांबून फोटो आणि व्हिडीओ काढू दिले; मात्र मागच्या बाजूने चालणाऱ्या कॅमेरामनला त्याने दिलेल्या एका दिलखुलास आणि मजेशीर इशाऱ्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
रीलच्या नादात धडकाल; वैभवचा मजेशीर इशारा कॅमेऱ्यात कैद –
दिल्ली विमानतळावरून बाहेर पडतानाचा वैभवचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. काळ्या रंगाचा हुडी आणि ट्रॅक पॅन्ट घालून सामानासह चालत असताना तो अचानक थांबला. त्याचे फोटो आणि रील काढण्यासाठी घाईगडबडीत उलटे चालणाऱ्या कॅमेरामनला पाहून त्याने हसतमुखाने, “रीलच्या नादात कुठे तरी धडकाल तुम्ही!” असा सावधगिरीचा सल्ला दिला. या १५ वर्षांच्या खेळाडूचा हा हजरजबाबी आणि सहज स्वभाव पाहून उपस्थितही हसू आवरू शकले नाहीत.
विंडीज मालिकेत समावेश; अजूनही पदार्पणाच्या प्रतीक्षेत –
🔴 VAIBHAV SURYAVANSHI GETS ANGRY ON PAPS 🤯
Vaibhav 🎙️: “Reels ke chakkar mein thok jaaoge tum!” 😭💀 https://t.co/Gj8wcKqO7Z
— Sam (@cricsam02) October 15, 2026
जुलै २०२६ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या वैभवने आपल्या आक्रमक फटकेबाजीने अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याचा संघात समावेश असला तरी पहिल्या चार सामन्यांत त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळालेली नाही. ही मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत असून १७ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात त्याला घरच्या मैदानावर पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळते का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
एशियन गेम्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट –
🔴 WINTER IS COMING FOR VAIBHAV SURYAVANSHI 😅
– Vaibhav has arrived at Delhi Airport to be felicitated by PM Modi. https://t.co/Cuxxj4NVQ8
— Sam (@cricsam02) October 15, 2026
नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एशियन गेम्समधील पदकविजेत्यांशी संवाद साधला. याप्रसंगी सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाने स्वाक्षरी केलेली जर्सी पंतप्रधानांना भेट दिली. यावेळी हॉकी, धनुर्विद्या आणि गोल्फमधील विजेत्यांनीही आपापली खेळसाहित्य भेट म्हणून दिली, तर पंतप्रधानांनी २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदाचा संकल्प पुन्हा एकदा ठामपणे बोलून दाखवला.





