Modi Asian Games : ८५ पदके अन् ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला; दिल्लीत पदकविजेत्यांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी दिला नवा मंत्र!
Modi Asian Games : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांची भेट घेतली. जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांसह एकूण ८५ पदके जिंकली.

PM Narendra Modi Meets Asian Games 2026 Medal Winners Reiterates 2036 Olympic Bid : जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारतीय पदकविजेत्या खेळाडूंचा नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर गौरव करण्यात आला. यावेळी खेळाडूंना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या २०३६ मधील ऑलिम्पिक यजमानपदाचा संकल्प पुन्हा एकदा ठामपणे मांडला. आपले स्वप्न आणि संकल्प मोठे आहेत, पण ते पूर्ण करण्याचा आत्मविश्वास प्रत्येक भारतीयामध्ये आहे, म्हणूनच भारत २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन नक्की करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ऐतिहासिक पदके आणि खेळाडूंकडून खास भेटवस्तू –
पंतप्रधानांनी खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले की, जेव्हा खेळाडूंचा ध्यास विजयात बदलतो, तेव्हा तो यशासोबत चेहऱ्यावर एक वेगळीच चमक घेऊन येतो. या ऐतिहासिक क्षणी आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच एकाच वेळी सुवर्ण जिंकणाऱ्या भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाने स्वाक्षरी केलेल्या स्टिक आणि जर्सी पंतप्रधानांना भेट दिल्या. सलग दुसऱ्यांदा सुवर्ण जिंकणाऱ्या दोन्ही क्रिकेट संघांनी जर्सी, नेमबाज-तिरंदाज कुमकुम मोहोद हिने धनुष्यबाण आणि सुवर्णपदक विजेती गोल्फर प्रणवी उर्स हिने गोल्फ बॉल व हातमोजे पंतप्रधानांना भेट म्हणून दिले.
८५ पदकांमध्ये ३८ पदके महिलांची; मुलींच्या कर्तृत्वाचा गौरव
Our Asian Games champions have made the Tricolour fly high! Their achievements show what passion, perseverance and belief can achieve. https://t.co/m3gOPecQCo
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2026
भारताने या स्पर्धेत जिंकलेल्या एकूण ८५ पदकांपैकी तब्बल ३८ पदके महिला खेळाडूंनी पटकावली असून यात ११ सुवर्णपदकांचा समावेश आहे. विशेषतः महिला हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावून ४४ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. १५ आणि १७ वर्षांच्या खेळाडूंच्या कामगिरीचा दाखला देत पंतप्रधानांनी सांगितले की, यशासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते. खेळाडूंनी आपल्या गावातील आणि सुरुवातीच्या मैदानांवर जाऊन नव्या पिढीला प्रेरणा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
१२ वर्षांतील चिकाटी अन् क्रीडा परिसंस्थेचा कायापालट –
Glimpses from a memorable interaction with our champions who made India proud at the Asian Games! https://t.co/YovmboGfBO
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2026
मेजर ध्यानचंद यांच्या समर्पणाचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की, मोठे संकल्प एका रात्रीत पूर्ण होत नाहीत. त्यासाठी वर्षानुवर्षे संयम आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची आवश्यकता असते. गेल्या बारा वर्षांत भारताने आपल्या खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत क्रीडा परिसंस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. खेळाडूंना देश आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास वाटणे हीच नव्या भारताची सर्वात मोठी ताकद आहे.
विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ; क्रीडामंत्र्यांनी मांडला आलेख –
याप्रसंगी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी गेल्या बारा वर्षांत क्रीडा क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. फिट इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडा धोरणासह नुकत्याच मंजूर झालेल्या ₹३६००० कोटींच्या नव्या खेलो इंडिया धोरणामुळे खेळ आता विकसित भारताचा मुख्य स्तंभ बनला असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह उपस्थित होते.





