Rohit Sharma : ‘मै पागल नही हूं, मुझे पता है…’, दमदार शतक झळकावल्यानंतर हिटमॅनचा ‘तो’ VIDEO व्हायरल

Rohit Sharma Video Viral : भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने शनिवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक ठोकत आपला फॉर्म सिद्ध केला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेल्या या सामन्यात रोहितने आपल्या खेळीने चाहत्यांची मनं जिंकली. या सामन्यातील विजयानंतर रोहितला सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले. या शतकासह त्याने आपल्या निवृत्तीच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम दिला आहे. परंतु त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रोहितने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, सिडनी येथील पाचवा कसोटी सामना तो खराब फॉर्ममुळे खेळू शकला नव्हता. त्यानंतर काही महिन्यांनी त्याने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबाबतही अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. काही माजी खेळाडू आणि तज्ज्ञांनी त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
रोहितचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल –
सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहित म्हणाला होता, “मी दोन मुलांचा बाप आहे, मी वेडा नाही. मला काय करायचं आणि कधी करायचं हे माहित आहे. मी स्वतःच माझ्या निवृत्तीची घोषणा सर्वप्रथम करेन.” त्याच्या या विधानाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Australian Women Cricketers : इंदौरात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेड काढणाऱ्या आरोपीला सहा तासात अटक!
रविवारी तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर रोहितने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “मला माहित नाही की आम्ही क्रिकेटर म्हणून परत येऊ की नाही, पण मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे.” सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार स्वीकारताना त्याने आपल्या कारकिर्दीचा आढावा घेतला. त्याच्या या टिप्पणीमुळे ऑस्ट्रेलियातील हा त्याचा अखेरचा सामना असू शकतो, असे संकेत मिळत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.





