Manav Suthar Award : पदार्पणातच मानव सुथारने रचला इतिहास! ७ विकेट्स आणि २ षटकार ठोकून पटकावला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा किताब
Manav Suthar Award : मानव सुथारला पदार्पणाच्याच सामन्यात थेट सामनावीर या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.

Manav Suthar POTM Award Test Debut INS vs AFG 2026 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि ३०० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताच्या या विक्रमी विजयात अनेक सिनियर्सनी योगदान दिले असले, तरी संपूर्ण सामन्याची महफील २३ वर्षांच्या युवा फिरकीपटू मानव सुथारने (Manav Suthar ) लुटली. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याच्या या अद्भूत आणि अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला पदार्पणाच्याच सामन्यात थेट सामनावीर या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. यासह कसोटी पदार्पणात हा किताब जिंकणारा तो भारताचा केवळ ९ वा खेळाडू ठरला आहे. (Manav Suthar Award)
दोन्ही डावांत ७ विकेट्स अन् बॅटनेही गाजवले मैदान! (Manav Suthar Award)
मानव सुथारने सामन्याच्या पहिल्या डावात २२ ओव्हर्समध्ये १० मेडन टाकत अवघ्या ३३ धावांत ६ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. यानंतर दुसऱ्या डावातही त्याने १० ओव्हर्समध्ये २९ धावा देत १ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतला. म्हणजेच संपूर्ण सामन्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या.
विशेष म्हणजे, गोलंदाजीपूर्वी भारताच्या पहिल्या डावात त्याने फलंदाजीतही चमक दाखवली. सुथारने ४१ चेंडूंत २ चौकार आणि २ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने २८ मौल्यवान धावा केल्या. या डावात भारताकडून त्याच्यापेक्षा जास्त (३ षटकार) केवळ ऋषभ पंतलाच मारता आले होते.
“टेस्ट क्रिकेट हा संयमाचा खेळ!”- विजयानंतर मानव भावूक (Manav Suthar Award )
Player of the Match on Test debut: Manav Suthar 🙌 pic.twitter.com/JaXfmj0ADF
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 8, 2026
सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर मानव सुथार भावूक झाला. तो म्हणाला, “ही माझ्यासाठी अत्यंत अविश्वसनीय भावना आहे. मी जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून भारतासाठी कसोटी खेळणे हेच माझे एकमेव स्वप्न होते, जे आज पूर्ण झाले. मी जेव्हा फलंदाजीला गेलो, तेव्हा पहिल्या २-४ चेंडूंतच समजले की पिचवर फिरकीला मदत आहे. मी फक्त अचूक लाईन आणि लेन्थवर लक्ष केंद्रित केले. या सामन्याने मला शिकवले की कसोटी क्रिकेट हा संपूर्णपणे संयमाचा खेळ आहे.”
प्रवीण आमरे ते यशस्वी जैस्वालच्या खास क्लबमध्ये एन्ट्री! (Manav Suthar Award )
भारताच्या १३६ वर्षांच्या कसोटी इतिहासात पदार्पणातच ‘प्लेयर ऑफ द मॅच’ जिंकणारा मानव सुथार हा केवळ ९ वा खेळाडू ठरला आहे. भारतासाठी सर्वात पहिल्यांदा हा पराक्रम १९९२ मध्ये प्रवीण आमरे यांनी केला होता, तर मानव सुथारच्या आधी २०२३ मध्ये यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्ध हा पुरस्कार जिंकला होता.





