Harmanpreet Savage Reply : “मी निवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटतं का?” पत्रकाराला उलट प्रश्न विचारत हरमनप्रीत कौरने घेतली फिरकी, पाहा VIDEO
Harmanpreet Savage Reply : टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी आयसीसीच्या अधिकृत पत्रकार परिषदेतील एका पत्रकाराचा आणि भारताची कर्णधारा हरमनप्रीत कौरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Harmanpreet Kaur Savage Reply To Journalist On Retirement : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर, आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या ऐतिहासिक स्पर्धेपूर्वी आयसीसीच्या अधिकृत पत्रकार परिषदेतील एका पत्रकाराचा आणि भारताच्या कर्णधाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या पत्रकार परिषदेत सर्व देशांच्या कर्णधारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला तिच्या निवृत्तीबाबत थेट प्रश्न विचारला, ज्यावर हरमनने असे काही चोख उत्तर दिले की तो पत्रकारच तोंडावर पडला. या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हरमनप्रीत कौर अन् पत्रकाराचा संवाद व्हायरल –
OH HARMAN…LOVE YOUUUU…
Muh bandh karane ka tareeka accha hain 🤣🤣 pic.twitter.com/V7eF9Syj2o— Poulami Basu (@poulami2991) June 7, 2026
पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने हरमनला विचारले, “हा तुमचा शेवटचा विश्वचषक असणार आहे का?” यावर हरमनप्रीतने जराही न डगमगता प्रतिप्रश्न केला, “का?” पत्रकाराने सारवासारव करत म्हटले, “सहज विचारत आहे.” तेव्हा हरमनने अत्यंत आक्रमकपणे विचारले, “तुम्हाला वाटतं का की मी थांबायला हवं?” त्यावर पत्रकाराने तात्काळ “अजिबात नाही” असे उत्तर दिले. शेवटी हरमनने “मग तुम्ही हा प्रश्न का विचारत आहात?” असे सुनावत पत्रकाराला स्टेजवरच निरुत्तर केले. हरमनच्या या ‘सॅव्हेज’ उत्तराचे फॅन्स प्रचंड कौतुक करत आहेत.
२०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांचा महाविक्रम खुणावतोय –
🚨 Harmanpreet Kaur cooked an English reporter:
Reporter: “And is this going to be your last World Cup?”
Harmanpreet: “What do you say?”Reporter: “Just asking. Just checking. Glad to see it’s not.”
Harmanpreet: “You think I should stop?”
Reporter: “Not at all, not at all.… pic.twitter.com/8V2K97XEJc— Indian Cricket Ministry (@ICM_News45) June 7, 2026
हरमनप्रीत कौर २००९ च्या पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्ड कपपासून भारतीय संघाचा भाग आहे. आतापर्यंतच्या सर्व १० च्या १० टी-२० वर्ल्ड कप हंगामात खेळणाऱ्या जगातील मोजक्या ७ महिला खेळाडूंपैकी ती एक आहे. या विश्वचषकादरम्यान हरमनप्रीतला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २०० सामने खेळण्याचा ऐतिहासिक जागतिक विक्रम खुणावत आहे. महिला आणि पुरुष क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणत्याही खेळाडूला २०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळता आलेले नाहीत.
पहिल्यांदाच १२ संघ; भारत ‘अ’ गटात –
महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच १२ संघ सहभागी होत आहेत. १२ जूनपासून बर्मिंगहॅम येथे यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने या महाकुंभाची सुरुवात होईल, तर ५ जुलै रोजी लॉर्ड्सवर अंतिम सामना खेळवला जाईल. भारतीय संघाचा समावेश सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या ‘अ’ गटात करण्यात आला आहे. या गटात ६ वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि पाकिस्तान यांसारख्या तगड्या संघांचा समावेश आहे.





