लष्करी उठावामुळे आमचे परतणे अवघड – रोहिंग्यांनी व्यक्त केली भीती

ढाका – म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी क्रांतीचा बांगलादेशात आलेल्या रोहिंग्य निर्वासितांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या लष्करी क्रांतीमुळे आमचे त्या देशात परतणे आता आणखी जिकरीचे बनले आहे. सन 2017 मध्ये म्यानमारच्या लष्कराने रोहिंग्य मुस्लिमांच्या प्रदेशात अनन्वीत अत्याचार केल्यामुळेच तेथील सात लाख रोहिंग्य मुस्लीम नागरिक बांगला देशात पळून आले आहेत आणि अजूनही ते तेथेच आश्रयला आहेत.
म्यानमार हा बौद्ध बहुल देश आहे.बांगला देशात आलेल्या या निर्वासीतांना म्यानमार मध्ये परत पाठवण्याचा कसोशिचा प्रयत्न बांगलादेश सरकारने केला. परंतु त्याला म्यानमारने अजून प्रतिसाद दिलेला नाही. आता तर तेथे लष्कराच्याच हातात सत्ता गेल्याने त्यांचे परतणे अवघड बनले आहे त्यामुळे रोहिंग्य निर्वासित आणखी चिंताग्रस्त बनले आहेत.
लष्कराने आमच्या महिलांवर बलात्कार केला आमच्यातील अनेकांच्या हत्या केल्या आमची घरे जाळली, त्यामुळे त्यांच्या नियंत्रणाखालील देशात आम्ही कसे सुरक्षित राहू शकू असा सवाल त्यांनी केला. मागच्याच महिन्यात बांगलादेश आणि म्यानमारच्या अधिकाऱ्यांमध्ये निर्वासितांच्या घरवापसी संबंधात चर्चा झाली होती. ही प्रक्रिया कशी सुरू करायची याचा तपशील ठरवला जात असतानाच म्यानमार मधील राजकीय सत्ता उलथवून तेथील लष्कराने ही सत्ता ताब्यात घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारच्या क्रांतीच्या विरोधात आवाज उठवून आमच्या देशात पुन्हा लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार प्रस्थापित करावे अशी मागणी रोहिंग्य मुस्लिमांनी केली आहे.





