IndiGo Flight Ticket Price Increase: इंडिगोचे तिकीट महागले; 425 ते 2300 इंधन अधिभार, 14 मार्चपासून लागू
IndiGo Flight Ticket Price Increase : इंडिगोने म्हटले आहे की इंधनाच्या किमतींमधील अचानक आणि मोठ्या वाढीचा संपूर्ण भार तिकीट दरांमध्ये समाविष्ट करण्याऐवजी केवळ आंशिक इंधन अधिभाराद्वारे प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

IndiGo Flight Ticket Price Increase: मध्यपूर्वेतील इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या आणि जेट इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने इंडिगो एअरलाइनने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर इंधन अधिभार (फ्यूल सरचार्ज) लागू करण्याची घोषणा केली आहे. हा अधिभार उद्या, १४ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटापासून सर्व नव्या बुकिंगवर लागू होईल.
इंधन ८५ टक्क्यांनी महाग –
इंडिगोने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) जेट फ्यूल मॉनिटरनुसार क्षेत्रातील इंधनाच्या किमतींमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जेट इंधन (ATF) ८५ ते ९० डॉलर प्रति बॅरलवरून थेट १५० ते २०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा वाटा सुमारे ४० टक्के असतो, त्यामुळे हा अतिरिक्त भार प्रवाशांवर टाकावा लागत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
मार्गनिहाय अधिभार किती?
इंडिगोने जाहीर केलेल्या नव्या दरपत्रकानुसार प्रति प्रवास प्रति सेक्टर खालीलप्रमाणे अतिरिक्त इंधन शुल्क आकारले जाईल.
एअर इंडियानंतर इंडिगोचीही भर
हा निर्णय एअर इंडियाच्या पावलावर पाऊल टाकत घेण्यात आला आहे. एअर इंडियाने १२ मार्चपासूनच देशांतर्गत उड्डाणांवर ₹३९९ आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर १० ते २०० डॉलर म्हणजे सुमारे ₹८०० ते ₹१८,००० पर्यंत टप्याटप्याने इंधन अधिभार लागू केला आहे. दोन्ही विमान कंपन्यांनी मध्यपूर्वेतील संकटामुळे एटीएफ किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीचा संदर्भ दिला आहे.
इंडिगोचे स्पष्टीकरण –
इंडिगोने म्हटले आहे की इंधनाच्या किमतींमधील अचानक आणि मोठ्या वाढीचा संपूर्ण भार तिकीट दरांमध्ये समाविष्ट करण्याऐवजी केवळ आंशिक इंधन अधिभाराद्वारे प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील, असेही कंपनीने नमूद केले आहे. या निर्णयामुळे विशेषतः युरोप आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे.






