Pant Away Sixes : गॉलमध्ये ऋषभ पंतचा ऐतिहासिक पराक्रम! ॲडम गिलख्रिस्टला मागे टाकत बनला नंबर वन यष्टीरक्षक फलंदाज
Pant Away Sixes : पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात फलंदाजीला उतरलेल्या ऋषभ पंतने आपल्या डावात पहिला षटकार ठोकताच कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे.

Rishabh Pant Breaks Adam Gilchrist Record Most Away Test Sixes Wicketkeeper : भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर राहिला. भारताने पहिल्या दिवसअखेर २ बाद २८८ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. देवदत्त पडिक्कल नाबाद १३१ धावांवर, तर ऋषभ पंत (Rishabh Pant) नाबाद २७ धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात फलंदाजीला उतरलेल्या ऋषभ पंतने आपल्या डावात पहिला षटकार ठोकताच कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. परदेशी मैदानावर सर्वाधिक षटकार ठोकणारा यष्टीरक्षक बनत त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ॲडम गिलख्रिस्टचा (Adam Gilchrist) विक्रम मोडीत काढला.
ॲडम गिलख्रिस्टला पछाडत पंत बनला ‘सिक्सर किंग’ –
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने ३ चौकार आणि १ गगनचुंबी षटकार लगावत नाबाद २७ धावा केल्या. या एका षटकारासह पंतच्या परदेशी मैदानांवरील कसोटी षटकारांची संख्या ५७ वर पोहोचली आहे. पंतचा हा परदेशी भूमीवरील ३४ वा कसोटी सामना असून ६० व्या डावात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी हा जागतिक विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलख्रिस्टच्या नावावर होता, ज्याने परदेशात ५६ षटकार ठोकले होते. आता गिलख्रिस्ट दुसऱ्या स्थानावर फेकला गेला असून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ३७ षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
परदेशी भूमीत कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारे यष्टीरक्षक:
- ऋषभ पंत (भारत): ५७ षटकार
- ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया): ५६ षटकार
- महेंद्रसिंग धोनी (भारत): ३७ षटकार
- क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका): १८ षटकार
- रॉड मार्श (ऑस्ट्रेलिया): १६ षटकार
आता फक्त बेन स्टोक्स पुढे; नंबर १ बनण्याची सुवर्णसंधी –
Rishabh Pant in test ! Unorthodox, fearless, and always box-office entertainment. Watching him dismantle bowling attacks with that unique flair is unmatched! pic.twitter.com/ned4yXmR83
— Cricket Desi Wala (@shahamalig) August 15, 2026
परदेशी मैदानांवर एकंदरीत सर्व फलंदाजांचा (फलंदाज आणि अष्टपैलूंसह) विचार केला, तर कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम इंग्लंडचा दिग्गज बेन स्टोक्सच्या (Ben Stokes – ६९ षटकार) नावावर आहे. या यादीतही ऋषभ पंत आता ख्रिस गेल (५१) आणि जॅक कॅलिस (४५) यांना मागे टाकत ५७ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बेन स्टोक्सला मागे टाकून जगातील अव्वल फलंदाज बनण्यासाठी पंतला आता केवळ १३ षटकारांची गरज आहे.





