Padikkal Independence Century : देवदत्त पडिक्कलचा ऐतिहासिक कारनामा! स्वातंत्र्यदिनी कसोटीत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
Padikkal Independence Century : देवदत्त पडिक्कलने स्वातंत्र्यदिनी शतक झळकावून भारतासाठी एक खास पराक्रम केला आहे.

Devdutt Padikkal First Test Century On Independence Day 15 August : भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) १५ ऑगस्टच्या ऐतिहासिक दिवशी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नेत्रदीपक शतक झळकावले आहे. या खेळीसह स्वातंत्र्यदिनी कसोटी शतक ठोकणारा तो भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने स्वातंत्र्यदिनी शतक झळकावले होते, मात्र त्याने ही कामगिरी एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये केली होती. गॉलच्या मैदानावर १३४ चेंडूंत पूर्ण केलेल्या या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर २ बाद २८८ धावांपर्यंत मजल मारत भक्कम पकड मिळवली आहे.
कोहलीनंतर १५ ऑगस्टचा हिरो; पडिक्कलचा नवा कीर्तिमान!
दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळालेल्या पडिक्कलने या संधीचे सोने केले. भारतीय डावाच्या ५७ व्या षटकात केशरा नुवांथाच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि १ षटकार ठोकला. यापूर्वी २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध स्वातंत्र्यदिनी विराट कोहलीने ९९ चेंडूंत नाबाद ११४ धावांची खेळी केली होती. आता कसोटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा पडिक्कल हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे कसोटीपूर्वी झालेल्या सराव सामन्यातही त्याने नाबाद १४२ धावा कुटल्या होत्या.
केएल राहुलसोबत १५० धावांची अभेद्य भागीदारी!
DEVDUTT PADIKKAL 💯🇮🇳
-FIRST INDIAN TO SCORE A TEST HUNDRED ON INDEPENDENCE DAY.
-DEVDUTT PADIKKAL IS THE SECOND LEFT-HANDER TO SCORE A TEST 💯 FROME NO THREE FOR INDIA IN THE 21st CENTURY , AFTER SOURAV GANGULY 136 AGAINST 🇿🇼 IN DELHI IN 2002.#TeamIndia#SLvIND pic.twitter.com/EvD6TPU6cU— Sports Wonderful World (@RathwaKevin) August 15, 2026
गॉलच्या फलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर पडिक्कल आणि अनुभवी केएल राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. प्रभात जयसूर्या, पदार्पण करणारा ऑफ-स्पिनर केशरा नुवांथा आणि कर्णधार धनंजय डी सिल्व्हा यांच्या फिरकी माऱ्याला निष्प्रभ करत या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. राहुलने १२७ चेंडूंत संयमी अर्धशतक झळकावले; मात्र स्नायूंच्या ताणामुळे (Cramps) त्याला ७७ धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले.
गॉल कसोटीवर पहिल्याच दिवशी टीम इंडियाचे वर्चस्व!
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ बाद २८८ धावांचा मोठा टप्पा गाठला आहे. एका बाजूने पडिक्कलने आक्रमक फटकेबाजी केली, तर दुसऱ्या बाजूने राहुलने संयमी साथ दिली. केवळ एका प्रसंगी राहुलच्या बॅटची कड घेऊन उडालेला चेंडू शॉर्ट लेगच्या क्षेत्ररक्षकापासून थोडक्यात दूर गेला; या व्यतिरिक्त दोन्ही फलंदाजांनी यजमान श्रीलंकेला सामन्यात पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.





