Test Timing Change : श्रीलंकेचा मोठा निर्णय! गॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वेळेत बदल; ९० ऐवजी ९८ षटकांचा होणार खेळ
Test Timing Change : श्रीलंका क्रिकेट मंडळाने दुसऱ्या दिवसाचा खेळ १५ मिनिटे आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs SL Galle Test Day 2 Timing Change 98 Overs Padikkal Pant : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन वेळा पावसाने हजेरी लावल्यामुळे तब्बल १७ षटकांचा खेळ वाया गेला होता. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाने दुसऱ्या दिवसाचा खेळ १५ मिनिटे आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता खेळ सकाळी १०:०० ऐवजी सकाळी ९:४५ वाजता सुरू होईल आणि संपूर्ण दिवसात ९० ऐवजी ९८ षटकांचा खेळ होईल.
भारताचे लक्ष्य ६०० धावांचा डोंगर उभारण्याचे –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने गॉलच्या खेळपट्टीवर आपली स्थिती अत्यंत भक्कम केली आहे. गॉलमध्ये चौथ्या डावात फलंदाजी करणे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते; ही बाब लक्षात घेता पहिल्याच दिवशी २ बाद २८८ धावा करणाऱ्या टीम इंडियाचे लक्ष दुसऱ्या दिवशी ६०० धावांचा टप्पा ओलांडण्यावर असेल. पहिल्या डावातच विशाल धावसंख्या उभारून यजमान श्रीलंकेला सामन्यातून पूर्णपणे बाहेर फेकण्याचा कर्णधार शुबमन गिलच्या संघाचा मानस आहे.
पडिक्कल-पंतची जोडी मैदानात; धावांचा पाऊस पाडण्यास सज्ज –
Stumps on Day 1: India 288/2 (Padikkal 131*, Jayasuriya 1/77).
All eyes on tomorrow morning to turn the momentum. Let’s go, Lions! #SLvIND pic.twitter.com/XRWxg9bze5
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 15, 2026
पहिल्या दिवसाचा हिरो ठरलेला युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) १७८ चेंडूंत १३१ धावांवर नाबाद असून दुसऱ्या दिवशी तो भारतीय डावाला पुढे नेईल. त्याच्यासोबत दुसऱ्या टोकावर आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (२७) उपस्थित आहे. हे दोन्ही डावखुरे फलंदाज दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात वेगाने धावा जमवून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतील.
केएल राहुल मैदानात परतण्याची दाट शक्यता –
पहिल्या दिवशी ७७ धावांवर असताना स्नायूंच्या ताणामुळे रिटायर्ड हर्ट झालेला केएल राहुल आता तंदुरुस्त असून तो दुसऱ्या दिवशी पुन्हा फलंदाजीसाठी उतरण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, पहिल्या दिवशी केवळ २ विकेट्स मिळवू शकलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांना सामन्यात पुनरागमन करण्यासाठी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात कमालीची अचूक गोलंदाजी करावी लागेल, कारण भारतीय फलंदाज खेळपट्टीवर पूर्णपणे स्थिरावले आहेत.





