पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दुसरे “रेस्टॉरंट ऑन व्हील’ पुणे रेल्वे स्टेशन येथे उभारण्याच्या कामाला गती आली आहे. रेल्वेचा डबा, हटके इंटेरियर, लाकडी टेबलवर बसून खाण्याचा आनंद आता प्रवाशांना घेता येणार आहे. हे काम प्रगतीपथावर आले असून, लवकरच खवय्यांसाठी हे रेस्टॉरंट सुरू होत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ट्रेनच्या जुन्या डब्यांचा वापर आर्थिक उत्पन्नाचे स्रोत म्हणून करून घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने “रेस्टॉरंट ऑन व्हील’ संकल्पना 2020 मध्ये आणली. जुन्या डब्यात आकर्षक डेकोरेशन करून हॉटेल तयार केले जाते. यामध्ये नागरिकांना जेवण, नाष्टा आणि प्रादेशिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. 24 तास ही सेवा सुरू असते. या संकल्पनेअंतर्गत पश्चिम बंगालच्या आसनसोल रेल्वे स्टेशनवर 26 फेब्रुवारी 2020 रोजी पहिले “रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू झाले. याला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि नागपूर येथे “रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू केले.
या दोन्ही ठिकाणी 1 लाख 50 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी जेवणाचा लाभ घेतला आहे. प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने आणखी चार ठिकाणी हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत पुणे विभागातील पहिले “रेस्टॉरंट ऑन व्हील’ चिंचवड रेल्वे स्थानकावर डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आले होते. आता पुणे स्टेशनवर हे काम सुरू आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी रामदास भिसे यांनी दिली.