वडगाव निंबाळकरचे प्रभारी पोलीस निरीक्षक लांडे यांचा इशारा
वाघळवाडी- डीजे व डॉल्बी वापरावर सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे, त्यामुळे कोणत्याही मंडळाने डीजे, डॉल्बी सिस्टीमचा वापर करणार नाही. प्रत्येक गणेश मंडळाने पारपंरिक वाद्याचा वापर करावा, अन्यथा डीजे, डॉल्बी मालक, चालक व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिला आहे.
आगामी गणेशोत्सव व मोहरम सणाचे अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते, पोलीस पाटील, पत्रकार, तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची बैठक शनिवारी (दि. 31 ऑगस्ट) शांततेत पार पडली त्यावेळी लांडे बोलत होते. याप्रसंगी बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चिंतामणी क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक राजाराम साळुंखे, श्रीगणेश कवितके, ज्येष्ठ पत्रकार अशोक वेदपाठक, मनोहर तावरे आदी उपस्थित होते.दरम्यान, यावेळी गणेशोत्सव 2018 मध्ये सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या तसेच विनाडॉल्बी शांततेत मिरवणूक पार पाडणाऱ्या मंडळांना श्री गणराया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोमनाथ लांडे म्हणाले की, धोकादायक पद्धतीने वीज जोर ( आकडे टाकून ) घेवू नये, गावामध्ये व मंडळा समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. साऊंडचा आवाज कमी ठेवावा, धार्मिक भावना दुखावतील व समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही देखावे सादर करू नये, फ्लेक्स उभारू नयेत, छेडछाड, चोरीच्या घटना घडू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन सुरक्षारक्षक, स्वयंसेवक नेमावेत, गणेश विर्सजन दिवशी गुलाल ,भंडाऱ्याची उधळण करू नये, रात्री उशीरा फटाके वाजवू नयेत, धोक्याच्या ठिकाणी सेल्फीचा मोह आवरावा, पुरपरीस्थीती पाहता आवाढव्य मंडप,देखावे , डेकोरेशनवरील अवास्तव खर्च न करता, साध्या पद्धतीने साजरा करून पुरग्रस्तास मदत करावी, संशयीत व्यक्ती, वस्तू आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संर्पक साधावा, जे गणेश मंडळ कायदेशीर बाबींचे पालन करेल व पर्यावरण पुरक व सामाजिक बांधिलकी जपुन उत्सव साजरा करेल ती गणेश मंडळे पुढील वर्षी गणराया आवर्डचे मानकरी ठरतील, असे त्यांनी नमूद केले.
श्री गणराया पुरस्कार 2018 चे मानकरी (गाव)
प्रथम : श्री जयगणेश मित्र मंडळ (लोणीभापकर), द्वितीय : स्वयंभू प्रतिष्ठाण गणेशोत्सव मंडळ (सायंबाचीवाडी), तृतीय : श्री स्वामी समर्थ गणेशोत्सव मंडळ (कोऱ्हाळे बुद्रुक). उत्तेजनार्थ : जय हनुमान तरुण मंडळ, (रानमळा काऱ्हाटी) एस. एम. बॉयज मंडळ (बाबुर्डी), वेताळबाबा मित्र मंडळ (उंडवडी सुपे), शिवतेज मित्रमंडळ (चौधरवाडी).