Ravichandran Ashwin Advice : “त्याला दृष्ट लागण्यापासून वाचवावं…!”वैभव सूर्यवंशीची परिपक्वता पाहून अश्विन थक्क; पालकांना दिला मोलाचा सल्ला
Ravichandran Ashwin Advice : भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने वैभवच्या मानसिक परिपक्वतेवर आश्चर्य व्यक्त केले असून, त्याच्या पालकांना एक मजेशीर पण मोलाचा सल्ला दिला आहे.

Ravichandran Ashwin on Vaibhav Sooryavanshi : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ७२ सामने पूर्ण झाले आहेत, परंतु एकाच खेळाडूची चर्चा संपूर्ण क्रिकेट जगतात सातत्याने सुरू आहे; तो खेळाडू म्हणजे राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षांचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी. नुकत्याच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या एलिमिनेटर सामन्यात वैभवने २९ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी केली. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने वैभवच्या मानसिक परिपक्वतेवर आश्चर्य व्यक्त केले असून, त्याच्या पालकांना एक मजेशीर पण मोलाचा सल्ला दिला आहे.
रविचंद्रन अश्विन काय म्हणाला?
रविचंद्रन अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना सांगितले की, या १५ वर्षांच्या मुलामध्ये एकाच हंगामात स्वतःच्या खेळात सुधारणा करण्याची आणि परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची अद्भूत क्षमता आहे. अश्विन म्हणाला, “मला इथे ‘१२-१५ वर्षांचा मुलगा’ असलेला कार्ड खेळायचा नाहीये. पण खरं सांगा, १५ व्या वर्षी त्याने नेमके किती सामने खेळले असतील, जेणेकरून त्याला एवढी मानसिक प्रगल्भता मिळाली आहे? जर तुम्हाला आठवत असेल, तर हंगामाच्या सुरुवातीला तो शॉर्ट बॉलवर सरळ शॉट खेळण्याचा प्रयत्न करायचा आणि चेंडू बॅटची वरची कडा घ्यायचा.”
त्याला ‘दृष्ट’ लागण्यापासून वाचवा!
अश्विन पुढे म्हणाला, “पण एलिमिनेटर सामन्यात त्याने त्याच चेंडूवर थर्ड मॅनच्या वरून शानदार अप्परकट षटकार मारला. अवघ्या १५ वर्षांच्या वयात एकाच सीजनमध्ये आपल्या खेळात एवढा मोठा बदल करणे सामान्य नाही. वैभव हा कोणताही सामान्य खेळाडू नाही. त्याच्या आई-वडिलांना जे काही करावे लागेल ते त्यांनी करावे, पण या मुलाला लोकांच्या ‘बुरी नजर’पासून (दृष्ट लागण्यापासून) वाचवून ठेवावे.”
साई सुदर्शनला मागे टाकत ‘ऑरेंज कॅप’वर पुन्हा कब्जा!
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १२ षटकार ठोकून वैभवने ख्रिस गेलचा एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा १४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. या वादळी डावाच्या जोरावर वैभवने ६८० धावांसह ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. तो दुसऱ्या स्थानावरील गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनपेक्षा २८ धावांनी पुढे निघून गेला आहे. या यादीत गुजरातचा कर्णधार शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली ६०० धावांसह सहाव्या स्थानावर आहे.





