Parthiv Patel Statement : “त्याचे व्हिडीओ पाहून आम्ही प्लॅन बनवलाय…”; वैभव सूर्यवंशीसाठी गुजरातची खास तयारी, पार्थिव पटेलचा खुलासा
Parthiv Patel Statement : गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी वैभव सूर्यवंशीला स्वस्तात बाद करण्यासाठी गुजरातने खास रणनीती आखल्याचा खुलासा केला आहे.

Parthiv Patel statement on Vaibhav Sooryavanshi : आयपीएल २०२६ मधील अत्यंत महत्त्वाच्या ‘क्वालिफायर-२’ सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन तगडे संघ आमनेसामने येत आहेत. या ब्लॉकबस्टर सामन्यात क्रिकेट जगताच्या नजरा पुन्हा एकदा राजस्थानचा १५ वर्षांचा ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशीवर असणार आहे. या अत्यंत प्रतिष्ठेच्या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी वैभव सूर्यवंशीच्या तुफानी फॉर्मचे कौतुक केले असून, त्याला स्वस्तात बाद करण्यासाठी गुजरातने खास रणनीती आखल्याचा खुलासा केला आहे.
“आम्ही व्हिडीओ पाहिलेत; पण रणनीती मैदानातच दाखवू!”
सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना पार्थिव पटेल म्हणाले, “वैभव ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्याने मी अत्यंत प्रभावित झालो आहे. तो एक विलक्षण प्रतिभा आहे. इतर संघांप्रमाणेच आम्हीही त्याचे व्हिडीओ पाहिले आहेत आणि त्याला सामन्याच्या सुरुवातीलाच बाद करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही त्याच्याविरुद्ध एक खास योजना तयार केली आहे, पण तो प्लॅन काय आहे, हे आम्ही थेट मैदानात उतरूनच दाखवू. मैदानावरील अंमलबजावणीच सामन्याचा निकाल ठरवेल. एक विरोधी संघ म्हणून आमची हीच इच्छा असेल की उद्या तो लवकर बाद व्हावा.”
‘एक्स फॅक्टर’ विरुद्ध ‘सातत्य’!
9️⃣7️⃣ runs of pure edge-of-the-seat brilliance 🫡
🎥 9️⃣7️⃣ seconds of Vaibhav Sooryavanshi doing 𝗩𝗮𝗶𝗯𝗵𝗮𝘃 𝗦𝗼𝗼𝗿𝘆𝗮𝘃𝗮𝗻𝘀𝗵𝗶 𝘁𝗵𝗶𝗻𝗴𝘀 🤩#TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/587tfDrWTS
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2026
राजस्थान रॉयल्सकडे वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चरच्या रूपाने ‘एक्स फॅक्टर’ खेळाडू आहेत, तर गुजरातचा संघ त्यांच्या सातत्यावर अवलंबून आहे. यावर पार्थिव म्हणाला, “जोपर्यंत आपल्याला सकारात्मक निकाल मिळत आहेत, तोपर्यंत एक्स फॅक्टर हवा की सातत्य, याचा विचार करण्याची गरज नाही. गुजरात टायटन्सने आपल्या ५ वर्षांच्या प्रवासात ४ वेळा प्ले-ऑफसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. आम्ही नेहमी आमच्या प्रक्रियेवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवतो. स्पर्धेच्या पूर्वार्धात आम्ही सरासरी खेळत होतो, पण आम्ही पुनरागमन केले आणि उद्याही आम्ही आमची नैसर्गिक शैली कायम ठेवू.”
ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडून वैभव ‘ऑरेंज कॅप’वर अव्वल!
वैभव सूर्यवंशीने नुकत्याच झालेल्या एलिमिनेटर सामन्यात हैदराबादविरुद्ध १२ षटकार मारून एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक (६५) षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. तो गेलचा ३० चेंडूंतील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ होता, पण २९ व्या चेंडूवर ९७ धावांवर बाद झाला. सध्या तो ६८० धावांसह ‘ऑरेंज कॅप’च्या यादीत अव्वल स्थानी आहे. आता उद्याच्या सामन्यात गुजरातचे गोलंदाज त्याला रोखण्यात यशस्वी होतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





