Ranjangaon Traffic: रांजणगावात पार्किंगचा बोजवारा! रस्त्यांवर अवजड वाहनांचा विळखा, एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष
Ranjangaon Traffic: सुसज्ज पार्किंग व्यवस्थेअभावी देशभरातून येणारे ट्रक आणि कंटेनर अर्ध्या रस्त्यावरच उभे; रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांसाठी रस्ते ठरतायत जीवघेणे.

Ranjangaon Traffic – पुणे- नगर महामार्गालगत असलेल्या राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या रांजणगाव एमआयडीसीमध्ये पार्किंगच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. हजारो कामगार, शेकडो उद्योग आणि दिवसाला हजारो लहान-मोठ्या वाहनांची ये-जा असलेल्या औद्योगिक परिसरात अवजड ट्रक, ट्रेलर, कंटेनर आणि मालवाहू वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तासन्तास उभी राहत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
परिणामी, किरकोळ ते गंभीर अपघातांची मालिका सुरू असून वाहनचालक, कामगार आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रांजणगाव एमआयडीसीमध्ये अनेक मोठे उद्योग कार्यरत असल्यामुळे देशभरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र, या वाहनांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज पार्किंगची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने चालक रस्त्यालगतच वाहने उभी करतात.
अनेक ठिकाणी ट्रक आणि कंटेनर रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापून उभे राहत असल्याने इतर वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभी असलेली अवजड वाहने अपघातांना आमंत्रण देत आहेत. अनेक वाहनचालकांना समोर उभे असलेले ट्रक किंवा ट्रेलर वेळेवर दिसत नसल्याने धडक होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनेकांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. स्थानिक नागरिक आणि उद्योजकांचे म्हणणे आहे की, पार्किंगच्या प्रश्नाबाबत अनेकदा औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
स्वतंत्र ट्रक टर्मिनल उभारा
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप सतीश पाचंगे यांनी केला आहे. उद्योगांमध्ये शिफ्ट बदलण्याच्या वेळेत तर वाहतुकीची मोठी कोंडी होत असून कामगारांना वेळेत कामावर पोहोचणेही कठीण होत आहे. प्रशासनाने तातडीने स्वतंत्र ट्रक टर्मिनल किंवा पार्किंग यार्ड उभारण्याची मागणी केली आहे.





