Ranjangaon MIDC : रांजणगाव एमआयडीसी परिसरात विषारी धुराचे साम्राज्य
Ranjangaon MIDC : रांजणगाव MIDC परिसरात औद्योगिक कचरा उघड्यावर जाळला जात असल्याच्या तक्रारी आहेत. धूर व दुर्गंधीमुळे पाच गावांतील नागरिक त्रस्त असून कारवाईची मागणी होत आहे.

Ranjangaon MIDC : रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरात औद्योगिक कचरा उघड्यावर जाळला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दिवसाढवळ्या कचरा जाळला जात असल्याने रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, सोनेसांगवी, कारेगाव आणि बाभुळसर खुर्द या गावांतील नागरिकांना दाट धूर व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रांजणगाव MIDC मधील काही उद्योगांतून निर्माण होणारा केमिकलयुक्त अथवा अन्य औद्योगिक कचरा मोकळ्या जागेवर आणून जाळला जात असल्याचा आरोप आहे. कचरा जाळल्यानंतर निघणारा धूर मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
कचरा गोळा करणे, वाहतूक करणे आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत काही ठेकेदारांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. हा कचरा कोणत्या उद्योगातून आणला जातो, त्याची वाहतूक कोण करतो आणि तो उघड्यावर का जाळला जातो, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली आहे का? कचऱ्याचे नमुने घेऊन तपासणी केली आहे का? तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर किंवा ठेकेदारांवर काय कारवाई केली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
चौकट : रांजणगाव MIDC परिसरात उघड्यावर ऑइल टाकणाऱ्या ठेकेदारावर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई का होत नाही, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांच्या मागण्या : कचरा जाळण्याच्या ठिकाणांची पाहणी करावी, कचऱ्याची तपासणी करावी, पाचही गावांतील हवेची गुणवत्ता तपासून अहवाल जाहीर करावा आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.





