Rajgurunagar News : राजगुरुनगरमध्ये वळवाच्या पावसाचा कहर! कासवा कॉम्प्लेक्समधील 30 दुकानांत शिरले पाणी; लाखोंचे नुकसान
Rajgurunagar News : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार वळवाच्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

Rajgurunagar News : रविवारी सायंकाळी राजगुरुनगर शहरात झालेल्या जोरदार वळवाच्या पावसाने मोठा हाहाकार माजवला. अवघ्या दीड ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. विशेषतः वाडा रस्त्यावरील कासवा कॉम्प्लेक्समध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तब्बल 25 ते 30 दुकानांचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Rajgurunagar News)
कंबरेएवढे पाणी, दुकानदारांची धावपळ
पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने आणि जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींमुळे रस्त्यावर साचलेले पाणी थेट कासवा कॉम्प्लेक्समध्ये घुसले. काही मिनिटांतच तळमजल्यावर तीन ते पाच फूट पाणी साचल्याने दुकानदारांची एकच धावपळ उडाली. अनेकांनी माल वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र अचानक आलेल्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले. (Rajgurunagar News)
हॉटेलपासून मोबाईल शॉपपर्यंत सर्वच बाधित
कासवा कॉम्प्लेक्समध्ये हॉटेल, मोबाईल शॉप, कपड्यांची दुकाने, झेरॉक्स सेंटर, भांड्यांची दुकाने, संसारोपयोगी वस्तूंची विक्री केंद्रे, टेलर्स, पान स्टॉल तसेच विविध कार्यालये आहेत. पाणी शिरल्यामुळे दुकानांतील माल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे भिजून मोठे आर्थिक नुकसान झाले. (Rajgurunagar News)
जलनिस्सारण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा नागरिकांनी केला. या घटनेनंतर शहरातील पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. (Rajgurunagar News)
व्यापाऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी
कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरण्यामागे अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि चुकीचे नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. (Rajgurunagar News)
Bhor Rain: बळीराजा सुखावला! भोर शहरासह ग्रामीण भागात मुसळधार; पेरणीच्या कामांना मिळणार प्रचंड गती
Maval Rain Update: शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे! पावसाने मारली दडी; यंदा भात उत्पादकांचे गणित बिघडणार?






