Bhor Rain: बळीराजा सुखावला! भोर शहरासह ग्रामीण भागात मुसळधार; पेरणीच्या कामांना मिळणार प्रचंड गती
Bhor Rain: भोर तालुक्यात चार दिवसांच्या दडीनंतर शनिवारी दुपारी जोरदार पाऊस; उकाड्यापासून नागरिकांची झाली सुटका.

Bhor Rain – तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी (दि. २७) दुपारी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि तीन वाजता पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे.
तालुक्यात रविवारी (दि. २१) पावसाने हजेरी लावली होती, मात्र बुधवारनंतर तो गायब झाला होता. कडक उन्हामुळे पुन्हा पाऊस लांबणार की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. अखेर शनिवारी दुपारनंतर भोर शहरासह ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझिम आणि त्यानंतर सलग तासभर मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. सध्या तालुक्यात पेरणीची कामे सुरू असून, हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.
रस्त्यांना आले ओढ्याचे स्वरूप
पावसाच्या जोरदार सरींमुळे भोर शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक मंदावली होती, तर पादचाऱ्यांनी दुकानांचा आसरा घेतला. सुदैवाने, पाऊस पडताना वादळी वारा नसल्याने कुठेही वित्तहानी झाली नाही. दरम्यान, पाऊस थांबल्यानंतर शहरातील बाजारपेठेत छत्री आणि रेनकोट खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.





