Maval Rain Update: शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे! पावसाने मारली दडी; यंदा भात उत्पादकांचे गणित बिघडणार?
Maval Rain Update: मावळ तालुक्यात उशिराने आलेल्या पावसाने पुन्हा दिली हुलकावणी; सुरुवातीच्या सरीनंतर पाऊस गायब झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल.

Maval Rain Update – मावळ तालुक्यात उशिराने सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. सुरुवातीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसह शेतीच्या कामांना वेग दिला. मात्र, एक- दोन दिवस सरी बरसल्यानंतर पाऊस पुन्हा रुसला असून पावसाच्या रुसव्याने शेतकरीवर्ग पुन्हा चिंतेत सापडला आहे. यंदा मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे आधीच शेतीची कामे रखडली होती.
पावसाची सुरुवात होताच भात, नाचणी, बाजरी व इतर खरीप पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्याने पेरलेले बियाणे उगवणीच्या टप्प्यावर अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या शेतकरीवर्ग आकाशाकडे डोळे लावून बसला असून, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वेळेवर आणि सातत्याने पाऊस झाल्यास खरीप हंगामाला दिलासा मिळेल. अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, ज्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. वेळेवर आणि सातत्यपूर्ण पाऊस पडणे हीच काळाची गरज असून, संपूर्ण मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पुन्हा एकदा पावसाकडे लागले आहे.





