पुणे – पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र बोऱ्हाडे, उपकार्याध्यक्षपदी एस. एम. जिर्गे, कार्यवाहपदी संजय गुंजाळ, कोषाध्यक्षपदी कृष्णाजी कुलकर्णी व कुलसचिवपदी दिनेश मिसाळ यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या परिषद व संचालक मंडळाच्या सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची २०२४ ते २०२८ या कालावधीकरिता निवड करण्यात आली.
यावेळी मावळते कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, संचालक मंडळातील रमेश कुलकर्णी, अमोल जोशी आदी उपस्थित होते. राजेंद्र बोऱ्हाडे म्हणाले, ११४ वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद वाटतो. ज्या संस्थेत शिकलो, त्याच संस्थेचा पदाधिकारी म्हणून काम करताना संस्थेची यशस्वी परंपरा सांभाळण्याची जबाबदारी आहे.
संस्थेच्या सहा शाखा असून, ६५ शैक्षणिक व सामाजिक विभाग आहेत. सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. यात आणखी भर घालून संस्थेचा विस्तार व नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.