Raja Ravi Varma Painting : भारतीय कला विश्वासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. महान चित्रकार ‘राजा रवी वर्मा‘ यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या प्रसिद्ध चित्राने लिलावात विक्रमी किंमत मिळवत इतिहास रचला आहे. हे चित्र तब्बल १६७.२० कोटी रुपयांना विकले गेले असून भारतीय चित्रकलेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित लिलावात या चित्रासाठी देश-विदेशातील संग्राहकांनी मोठ्या उत्साहाने बोली लावली. अखेर उद्योगपती सायरस ए. पूनावाला यांनी सर्वाधिक किंमत देत हे चित्र खरेदी केले. ते जगातील आघाडीच्या लस उत्पादक कंपनी ”Serum Institute of India’ चे अध्यक्ष आहेत. पूनावाला यांनी या चित्राचे वर्णन ‘राष्ट्रीय ठेवा’ असे केले असून, हे चित्र ठराविक काळाने लोकांसाठी प्रदर्शनात ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. चित्राची वैशिष्ट्ये : ‘यशोदा आणि कृष्ण’ हे चित्र १८९० च्या दशकात तयार करण्यात आले असल्याचे मानले जाते. या चित्रात माता यशोदा गायीचे दूध काढताना दिसतात, तर लहान कृष्ण हातात पेला घेऊन निरागस भावनेने उभा आहे. चित्रातील मातृत्व, प्रेम आणि ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण हे याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. Raja Ravi Varma Painting राजा रवी वर्मा यांनी भारतीय पौराणिक पात्रांना मानवी भावनांमधून साकारण्याची अनोखी शैली विकसित केली. त्यामुळे देवदेवतांची प्रतिमा सामान्य लोकांना अधिक जवळची वाटू लागली. युरोपियन चित्रकलेच्या तंत्राचा वापर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणे ही त्यांची खास ओळख होती. शैली: रवि वर्मा यांनी हिंदू महाकाव्ये आणि पौराणिक कथांमधील पात्रांना मानवी आणि वास्तववादी रूप दिले. रेशमी कापडाचा पोत, दागिन्यांची चमक आणि चेहऱ्यावरील भाव यामुळे हे चित्र अत्यंत जिवंत वाटते. कायदेशीर संरक्षण: राजा रवि वर्मा यांच्या कलाकृतींना भारताच्या ‘प्राचीन वस्तू आणि कला संपदा’ कायद्यांतर्गत ‘कला ठेवा’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे हे चित्र भारताबाहेर नेले जाऊ शकत नाही आणि केवळ भारतीय खरेदीदारांनाच ते विकता येते. विक्रमी लिलाव : या चित्राची अंदाजे किंमत ८० ते १२० कोटी रुपयांच्या दरम्यान अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्ष लिलावात बोलीची स्पर्धा वाढत गेली आणि अंतिम किंमत १६७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. यामुळे भारतीय कलेच्या बाजारात मोठी चर्चा रंगली आहे. Raja Ravi Varma Painting यापूर्वी भारतीय चित्रकलेतील विक्रम एम. एफ. हुसैन यांच्या एका चित्राच्या नावावर होता. आता रवी वर्मा यांच्या कलाकृतीने तो विक्रम मागे टाकला आहे. राजा रवी वर्मा यांचे योगदान : १८४८ साली केरळमध्ये जन्मलेल्या राजा रवी वर्मा यांना आधुनिक भारतीय चित्रकलेचे जनक मानले जाते. त्यांनी रामायण, महाभारत आणि पुराणातील प्रसंग चित्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या चित्रांमुळे देवदेवतांची दृश्य प्रतिमा भारतीय समाजात लोकप्रिय झाली. त्यांनी सुरू केलेल्या लिथोग्राफिक प्रिंट्समुळे त्यांच्या चित्रांच्या प्रती सर्वसामान्य घरांपर्यंत पोहोचल्या आणि भारतीय धार्मिक कला नव्या स्वरूपात विकसित झाली. Raja Ravi Varma Painting भारतीय कलेसाठी नवा अध्याय : ‘यशोदा आणि कृष्ण’ या चित्राच्या विक्रीमुळे भारतीय कलेची जागतिक स्तरावर वाढती प्रतिष्ठा पुन्हा अधोरेखित झाली आहे. कला ही केवळ सांस्कृतिक वारसा नसून गुंतवणुकीचा महत्त्वाचा पर्याय बनत असल्याचे या विक्रमी लिलावातून स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतीय कलाकारांच्या दुर्मिळ कलाकृतींची मागणी पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय कला बाजारासाठी हा लिलाव ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.