पुणे – प्रसिध्द उद्योजक व सीरम इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. परवेझ ग्रॅंट यांच्या देखरेखीखाली पूनावाला यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे सल्लागार अली दारूवाला यांनी दिली.
डॉ. परवेझ ग्रॅंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सायरस पूनावाला यांना दि. 16 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांना तत्काळ रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता चांगली असून, दोन दिवसात त्यांना घरी सोडण्यात येईल. सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
1966 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. या कंपनीचे मुख्यालय पुण्यात असून, करोनामध्ये कमी वेळेत प्रभावी लस तयार करण्यात कंपनीचे मोठे योगदान आहे. तसेच सीरम दरवर्षी गोवर, पोलिओ आणि फ्लूसह लसींचे 1.5 अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करते.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते चांगले मित्र, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी पवार रूबी हॉलमध्ये येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.