IND vs WI 5th T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील निर्णायक पाचवा टी-२० सामना रद्द होणार? मग कोणाला मिळणार ट्रॉफी? जाणून घ्या
IND vs WI 5th T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील निर्णायक सामना बंगळूर येथे खेळला जाणार असून या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने तो रद्द होण्याची शक्यता आहे.

Rain Threatens IND vs WI 5th T20I Decider in Bengaluru : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक लढतीवर पावसाचे काळे दाटून आले आहेत. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर १७ ऑक्टोबर रोजी हा हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. सध्या मालिका २-२ अशी बरोबरीत असल्याने या सामन्यात मालिकेचा विजेता ठरणार आहे. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान पावसाची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने क्रिकेट चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.
पाऊस सलग पडल्यास मालिका बरोबरीत; दोन्ही संघांत ट्रॉफी विभागली जाणार –
या संपूर्ण मालिकेत दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली आहे. विंडीजने दुसऱ्या लढतीत २५० धावांचा पाठलाग केला होता, तर चौथ्या सामन्यात भारताला २४ धावांनी नमवून मालिकेत बरोबरी साधली. दोन्ही संघांमधील चुरस पाहता बंगळुरूमध्ये धावांचा पाऊस पडण्याची अपेक्षा होती; मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे सामना रद्द झाला, तर मालिका २-२ अशी अनिर्णित राहील. अशा स्थितीत भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करून ट्रॉफी विभागून दिली जाईल.
चार वर्षांनंतर भुवनेश्वरला प्लेइंग इलेव्हमध्ये संधी मिळण्याची शक्यता –
निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे अर्शदीप सिंगच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह असून, त्याच्या जागी चार वर्षांनंतर संघात परतलेल्या भुवनेश्वर कुमारला प्लेइंग इलेव्हमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भुवीला या महत्त्वाच्या सामन्यात आपली लय सिद्ध करता येईल. चिन्नास्वामीच्या छोट्या मैदानावर त्याचा दांडगा अनुभव आणि स्विंग गोलंदाजी भारतासाठी निर्णायक ठरू शकते.
चिन्नास्वामीची ड्रेनेज सिस्टीम अव्वल; पावसाच्या विश्रांतीकडे लक्ष –
एम. चिन्नास्वामी स्टेडियमची सब-एअर ड्रेनेज प्रणाली देशातील सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे पाऊस थांबल्यास अवघ्या काही मिनिटांत मैदान खेळण्यायोग्य बनवता येते. मात्र, पावसाची संततधार कायम राहिल्यास पंचांसमोर सामना रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे आता सर्व नजर बंगळुरूच्या आकाशाकडे आणि हवामानाकडे लागून राहिली आहे.





