India Split Squad : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दोन वेगवेगळे भारतीय संघ जाहीर; गिल-अय्यर कर्णधार अन् किशन उपकर्णधार
India Split Squad : बीसीसीआयने न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचे दोन वनडे संघ जाहीर केले आहेत.

Shubman Gill and Shreyas Iyer to lead India in NZ ODI series BCCI announces split squads : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी दोन भारतीय संघांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. खेळाडूंच्या कामाचा ताण आणि कसोटी मालिकेची तयारी लक्षात घेऊन निवड समितीने एकाच मालिकेसाठी दोन स्वतंत्र संघ जाहीर केले आहेत. पहिल्या तीन सामन्यांचे नेतृत्व शुबमन गिलकडे सोपवण्यात आले असून अखेरच्या दोन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर भारतीय संघाची धुरा सांभाळणार असून इशान किशनकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे
एकाच मालिकेसाठी दोन संघ अन् दोन कर्णधार का?
पाच सामन्यांची ही एकदिवसीय मालिका ४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान न्यूझीलंडमध्ये रंगणार आहे. त्यानंतर लगेचच १९ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची अत्यंत महत्त्वाची कसोटी मालिका सुरू होणार आहे. वनडे आणि कसोटी मालिकेमध्ये अवघ्या तीन दिवसांचे अंतर आहे. कसोटी संघातील प्रमुख खेळाडूंना लाल चेंडूच्या क्रिकेटचा पुरेसा सराव मिळावा, यासाठी ते अखेरच्या दोन वनडे सामन्यांमधून बाहेर पडणार आहेत. म्हणूनच बीसीसीआयने पहिल्या तीन सामन्यांसाठी गिल आणि उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर अशा दोन कर्णधारांची रणनीती आखली आहे.
अखेरच्या दोन सामन्यांत चार मोठे बदल –
मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी संघात चार मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या तीन सामन्यांचा कर्णधार शुबमन गिलसह केएल राहुल, प्रसिध कृष्णा आणि अंशुल कंबोज हे खेळाडू कसोटीच्या तयारीसाठी वनडे संघातून बाहेर पडतील. त्यांच्या जागी कुमार कुशाग्र, यश ठाकूर, तिलक वर्मा आणि आकिब नबी या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच या दोन सामन्यांसाठी इशान किशनकडे उपकर्णधारपदाची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
🚨 News 🚨
#TeamIndia’s ODI and Test squads for New Zealand tour announced 📝
Captain Shubman Gill will lead the side for the first 3️⃣ ODIs, before Shreyas Iyer takes charge for the last 2️⃣ matches.
More details ▶️ https://t.co/npwxUYlb1N
#NZvIND https://t.co/3ckm7ixgEN
— BCCI (@BCCI) October 16, 2026
पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन यष्टीरक्षक, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा तंदुरुस्तीच्या अधीन आणि कुलदीप यादव.
शेवटच्या दोन वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक व उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र यष्टीरक्षक, मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव.





