पुणे -जूनमध्ये मोठी ओढ दिल्यानंतर अखेरच्या टप्प्यात मान्सून अर्थात मोसमी पाऊस सक्रिय झाला. आता पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतात मान्सून जोरदार बरसण्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी शुक्रवारी माहिती दिली.
महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणाच्या काही भागांत पावसाने ओढ दिली आहे. तेथेदेखील येत्या काळात पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. जुलैमध्ये देशभरात एकूण सरासरीच्या 94 ते 106 टक्के (सामान्य) पाऊस होण्याचा अंदाज आहे. सन 1971 ते 2020 जुलैमध्ये झालेल्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करून हा अंदाज मांडण्यात आला आहे.
दरम्यान, जुलैमध्ये देशात पावसाची सरासरी 280.4 मि.मी. इतकी आहे. तर, जुलै-2023 मध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये विशेषत: मध्य भारत, पूर्व भारत, पूर्वोत्तर भाग, दक्षिण द्वीपकल्प, वायव्येकडील काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर, ईशान्येकडील काही राज्य, आग्नेय द्वीपकल्पाच्या काही भागांत सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे,’ असे मोहपात्रा यांनी सांगितले.
“बिपरजॉय’मुळे फायदाच…
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्राथमिक टप्प्यातील वाटचालीस पूरक स्थिती निर्माण झाली. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात जोरदार पाऊस झाला. शिवाय, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे जूनअखेरीस मान्सूनची वाटचाल जोमाने झाली, असे हवामान विभागाने म्हटले आहे.