कोलकाता -अजिंक्य रहाणे व शिवम दुबेची वादली फलंदाजी व गोलंदाजांनी दिलेली योग्य साथ यांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रविवारी आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी विजय मिळवला. हा सामना उच्चांकी धावसंख्येचा ठरला. चेन्नईने 235 धावांचा डोंगर उभारला होता व कोलकाताला त्यांच्या घरच्याच मैदानावर 8 बाद 186 असे रोखले.
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 236 धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलेला सुनील नरेन डावातील पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात एन. जगदीशनही परतला. यावेळी कोलकाताच्या 2 बाद 1 धावा अशी बिकट स्थिती बनली होती. अय्यरने कर्णधार नितीश राणाच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, तो 20 धावांवर तर राणा 27 धावांवर बाद झाला. त्यावेळी एकत्र आलेल्या जेसन रॉय व रिंकू सिंग यांनी फटकेबाजी करत आधी संघाचे शतक फलकावर लावले. रॉयने 26 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी करत 61 धावांची खेळी केली. वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.
रिंकू सिंगने आंद्रे रसेलला साथिला घेत संघाचा दीडशकी पल्ला पार करुन दिला. रिंकू सिंग मात्र, आपल्या नेहमीच्याच थाटात फलंदाजी करत होता. रसेलनेही निराशा केली. त्यानंतर डेव्हीड वीसे व उमेश यादव साफ अपयशी ठरले. दरम्यान रिंकू सिंगने अर्धशतक फटकावले. मात्र, तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. त्याने आपल्या नाबाद 53 धावांच्या खेळीत 33 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 4 षटकार फटकावले. चेन्नईकडून तुषार देशपांडे व महिशा तक्षिणा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
तत्पूर्वी, डेव्हन कॉनवे, ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीनंतर शिवम दुबे व अजिंक्य रहाणे यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकातासमोर विजयासाठी 236 धावांचे आव्हान ठेवले. कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकत चेन्नईला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर कॉनवे व ऋतुराज यांनी 73 धावांची धडाकेबाज सलामी दिली. ऋतुराज चांगला खेळत असताना 20 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांसह 35 धावांवर बाद झाला. त्यानंतर कॉनवेने अजिंक्य रहाणेच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले. दरम्यान कॉनवेने अर्धशतकही थाटात साकार केले. चेन्नईच्या फलंदाजांनी षटकामागे 10 धावांची सरासरी पहिल्या षटकापासूनच राखली होती. कॉनवे 40 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 56 धावा करून बाद झाल्यावर कोलकातासमोर खरे आव्हान निर्माण झाले.
अजिंक्य रहाणे व शिवम दुबे यांनी कोलकाताच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. दुबे व रहाणे या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 85 धावांची भक्कम भागीदारी केली. याच आक्रमकतेमुळे दुबे बाद झाला. मात्र, त्याने अवघ्या 21 चेंडूत 2 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. यानंतर रहाणेने जडेजाला साथीला घेत संघाचे द्विशतक पूर्ण केले.
दरम्यान त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले होते. त्यानंतर खरेतर तो जास्त आक्रमक फलंदाजी करू लागला. चौकार षटकारांच्या आतषबाजीत कोलकाताच्या गोलंदाजांची दिशाच चुकत होती. त्यातच जडेजा 18 धावांवर बाद झाला व कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रहाणेला साथ देत यंदाच्या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. चेन्नईने मर्यादित 20 षटकांत 4 गडी गमावून 235 असा धावांचा डोंगर उभारला. रहाणे 71 धावांवर नाबाद राहिला तर धोनीने नाबाद 2 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 4 बाद 235 धावा. (ऋतूराज गायकवाड 35, डेव्हन कॉनवे 56, शिवम दुबे 50,ं रवींद्र जडेजा 18, अजिंक्य रहाणे नाबाद 71, महेंद्रसिंह धोनी नाबाद 2, कुलवंत खेजरोलिया 2-44, सुयश शर्मा 1-29, वरुण चक्रवर्ती 1-49). कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 8 बाद 186 धावा. (व्यंकटेश अय्यर 20, नितीश राणा 27, जेसन रॉय 61, रिंकू सिंग नाबाद 53, महिशा तक्षिणा 2-32, तुषार देशपांडे 2-43).
रहाणेचे वादळ
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कसोटी फलंदाज असा शिक्का अजिंक्य रहाणेने पुसून काढला आहे. त्याने या स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक फटकावले. त्याने अवघ्या 29 चेंडूत 71 धावांची वादळी खेळी केली. त्यात 6 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली.