फुरसुंगी, दि. 15 (प्रतिनिधी) – हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी येथे दिवेघाटाच्या पायथ्याला असलेला मस्तानी तलाव गेली दोन वर्षे पूर्ण भरला नव्हता, यावेळी मात्र सततच्या पावसाने हा तलाव भरला आहे.
दिवेघाट माथा तसेच वडकी परिसरात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाल्याने डोंगरावरील झरे वाहू लागले. पाऊसाचा जोर इतका होता, की संपूर्ण दिवघाटातील रस्त्यावरून नदीप्रमाणे पाणी वाहत होते. झरे तसेच डोंगरमाथ्यावरून कोसळणारे पाणी मस्तानी तलावात आल्याने तलाव पूर्ण भरून वाहू लागला आहे.
परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तलाव भरला, यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांसह पर्यटकांनीही समाधान व्यक्त केले. दरम्यान, पूर्व हवेली तालुक्यात फुरसुंगी, वडकी, उरूळीदेवाची तसेच दिवेघाट परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. दिवेघाटात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने वाहतूक काही काळ घाटात थांबली होती.