Ajit Pawar : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका; सिंहगड रोड उड्डाणपुलाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाईम थिएटरपर्यंत बांधण्यात आलेल्या २१२० मी लांबीच्या पुलाचे उद्घाटन पार पडले. या उड्डाणपुलामुळे सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीतून पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने आणि चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अजित पवार यांनी उड्डाणपूलाच्या कामाची माहिती घेतली. या पुलामुळे राजाराम पूल ते वडगावकडे जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. तसेच या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची गैरसोय दूर होऊन पुण्याच्या पायाभूत विकासाला चालना मिळेल, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
२०२१ मध्ये या पूलाचं भूमीपूजन झालं होतं. ६१ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. १०६ गर्डर उभारले आहेत. आज अजित पवारांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झाल्यानंतर आता हा पुल नागरिकांसाठी खुला करण्यात येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी अजित पवार आज सकाळी पुण्यातील सर्व कार्यक्रम आटोपून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. सकाळी साडे सहा वाजण्याच्या आसपास पुण्यातील विभागीय आयुक्तालयात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीचे उद्घाटन केले.
त्यानंतर सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत बहुप्रतिक्षित सिंहगड रोड वरील उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडले. सकाळी ८ वाजता राज्याच्या ६६ व्या स्थापना दिवसानिमित्त पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. हे तीन कार्यक्रम संपल्यावर अजित पवार मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.





