Pune ZP School: जिल्हा परिषद शाळांची ‘क्रेझ’ कायम! २३ गावे समाविष्ट होऊनही दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद
Pune ZP School: १५ हजारांहून अधिक विद्यार्थी पुणे महापालिकेत हस्तांतरित; तरीही दर्जेदार शिक्षण आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेचा दबदबा कायम.

Pune ZP School – पुणे महापालिकेत शहरालगतच्या २३ गावांचा समावेश झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ६५ शाळा महापालिकेकडे वर्ग करण्यात आल्या. परिणामी, सुमारे १५ हजार ८६२ विद्यार्थी मनपा शाळांमध्ये हस्तांतरित झाले. असे असूनही पुणे जिल्हा परिषदे शाळांमधील पटसंख्या घटलेली नाही. आजमितीला तब्बल दोन लाखांहून अधिक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांत शिक्षण घेत आहेत.
खासगी शाळांच्या तुलनेत दर्जेदार शिक्षणासह नवनवीन उपक्रमांमुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांसह विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवी आणि काही ठिकाणी दहावीपर्यंतच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा कार्यरत आहेत. खासगी इंग्रजी शाळांचे वाढते वर्चस्व पाहता, जिल्हा परिषदेने शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी नावीन्यपूर्ण पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निवडक विद्यार्थ्यांना थेट नासा आणि इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांना भेटी देण्याची संधी दिली जाते.
याशिवाय विद्यार्थ्यांना फ्रेंच आणि जर्मन भाषांचे धडे दिले जात असून, पुणे मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत शाळांचे वर्ग आणि सोयीसुविधा अद्ययावत केल्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम थेट पटसंख्येवर दिसून येत आहे. दरम्यान, महापालिकेकडे वर्ग झालेले १५ हजारांहून अधिक विद्यार्थी वजा जाता ही आकडेवारी अजूनही मजबूत आहे. सद्यस्थितीत नवीन प्रवेश आणि यु-डायस पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
“जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी पुणे शहरालगतच्या २३ गावांमधील ६५ शाळा महापालिकेकडे वर्ग झाली असली, तरीही शैक्षणिक दर्जामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांत अद्यापही दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या आहे.”
– वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे





